“बस डे” च्या माध्यमातून पुण्याची शाश्वततेकडे वाटचाल

पुणे:  आपली शहरे कोविड-१९ च्या संकटातून सावरत असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड – पी.एम.पी.एम.एल. ने या “बस डे”च्या माध्यमातून जनजागृती करून बस-आधारित सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १८ एप्रिल २०२२ रोजी ‘बस डे’च्या माध्यमातून या उत्सवाची सुरुवात झाली आणि आठवडाभर अनेक विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार कुणाल खेमनार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पी.एम.पी.एम.एल.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पुणे शहर राहुल श्रीरामे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी पीएमपीएमएल बस प्रवासाचे अनुभव सांगितले.

पी.एम.पी.एम.एल.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, आमचे उद्दिष्ट केवळ १०-१२ लाख लोकांना दररोज सेवा देण्याचे नाही, तर आपण स्वायत्त बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. जेणेकरून आपल्याला दोन्ही महापालिकांवर आर्थिक मदतीसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. इतर देश आधीच सर्वांसाठी मोफत सार्वजनिक वाहतुकीचा प्रयोग करत आहेत आणि तेच आमचे अंतिम ध्येय आहे. नॉन-तिकीटिंग महसूल वाढवणे, तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन पिढीला सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी आणि सर्वांना सुरक्षित सोयीस्कर आणि परवडणारी वाहतूक सुनिश्चित करण्याकडे आमची वाटचाल असेल.

यावेळी ‘पी.एम.पी.एम.एल. व्हिजन २०२७’ – शहरासाठी शाश्वत वाहतुकीची ध्येये आखणारी पुस्तिका व पीएमपीएमएलने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम दर्शवणारे माहितीपत्राचे देखील उद्घाटन करण्यात आले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: