Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

श्रद्धा, नास्तिकतेविषयी प्रगल्भ मानसिकता रुजविण्याचे काम साहित्यिकांनी करावे – प्रा. मिलिंद जोशी

पुणे : आजचे सभोवतालचे वास्तव विषण्ण करणारे आहे. स्वातंत्र्यानंतर आपण निधर्मी लोकशाही स्वीकारली. व्यक्तिगत जीवनात उंबरठ्याच्या आतच धर्म असला पाहिजे अशी आपल्या राज्य घटनेची भूमिका होती, पण आज आपण धर्माचा बाजार मांडताना दिसतो आहोत. देव आणि धर्म या दोन्ही गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत, त्या माणसापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत. श्रद्धा आणि नास्तिकता या दोन्हीचाही आदर करण्याची प्रगल्भ मानसिकता समाजमनामध्ये रुजविण्यचे काम साहित्यिकांनी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

शिरीष चिटणीस संपादित ‘प्रतिभा साधन.. भारत सासणे यांचे साहित्य विश्व’ या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त न्यायमूर्ती हभप डॉ. मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी अध्यक्षपदावरून प्रा. जोशी बोलत होते. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कवी विश्वास वसेकर, साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू व्यासपीठावर होते.

भारत सासणे यांच्या समग्र साहित्यावर गेल्या महिन्यात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चासत्रात सासणे यांच्या साहित्यावर झालेली चर्चा या पुस्तकरूपाने मांडण्यात आली आहे.

या पुस्तकामुळे सासणे यांच्या समग्र साहित्याकडे पाहण्याची दृष्टी वाचकांना आणि जाणकारांना मिळणार आहे, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, समग्रपणे विचार करण्याची शक्ती गमावणे ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. समग्रता हे देखील मूल्य आहे. समग्रता हे मूल्य हरविले तर समाज एकांगीपणाने विचार करायला लगतो. एकांगी विचार करणारी माणसे आणि समाज हे लोकशाहीसाठी घातक आहेत. ते पुढे म्हणाले, माणसातल्या दीव्यत्वाचा परिचय करून देणे धर्माचे खरे काम आहे. धर्मामुळेच माणसाला अग्निदिव्यातून जावे लागत असेल तर धर्मविचारांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. आजचे राजकारण धर्माभोवती फिरते आहे. राजकारण आणि समाजकारण यातील सीमारेषा पुसून गेलेली आहे. राजकारण सामान्य माणसाचा विचार करीत नाही तेव्हा राजकारणाचे अध:पतन झाले आहे, असे समजायला हरकत नाही, अशी टिप्पणीही प्रा. जोशी यांनी केली. दिशाहीन राजकारण्यांना साहित्यिकांनी दिशा दाखविण्याचे काम करावे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading