दीर्घ कालावधीनंतर लोककलावंतांचे पुणेकरांसमोर प्रथमच सादरीकरण

पुणे : वाजतगाजत येणारी वारकर्‍यांची दिंडी, भल्या पहाटे येणारा वासुदेव, मंगल कार्याप्रसंगी येणारा गोेंधळी, देवीचा पोतराज आणि सामाजातील अनिष्ट प्रथांवर आसूड ओढणार्‍या कडकलक्ष्मीचे दर्शन घडले दोन वर्षांच्या कालखंडानंतर. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठिण परिस्थितीत हातावर हात ठेवून बसलेल्या लोककलावंतांचे प्रथमच सादरीकरण झाले पुण्यनगरीत. निमित्त होते ते भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीने आयोजित केलेल्या ‘बहुरुपी भारूड’ या विशेष कार्यक्रमाचे!

यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष जगदिश मुळीक आणि माजी न्यायमूर्ती हभप डॉ. मदन महाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 30 कलावंतांसह शुद्ध पारंपरिक भारुडांचा कार्यक्रम यावेळी रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात वारकरी दिंडीने झाली. त्यानंतर आला तो डॉ. भावार्थ देखणे यांनी सादर केलेला वासुदेव. दान घ्यायचे आणि ज्ञान द्यायचे असा संदेश या वासुदेवाने दिला. अनिष्ट प्रथांवर आसूड ओढत कडकलक्ष्मीने समाज प्रबोधनावर भर दिला. वेडेपण असल्याशिवाय संस्कृती टिकत नाही हे तर भारुडातील वेडीने दाखवून दिले. देवीचा गोंधळ घालत मातृवंदनाचा पाठ घडविला. संबळ, ढोलकी, पखवाज, चौघडा आणि तबला यांच्यातील जुगलबंदीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला तर तुतारी वादनाने त्यावर कळस चढविला. कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी सादर केलेल्या भैरवी अन् पसायनादाने झाला. 

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, अभिजात रंगभूमीचा जन्म लोकरंगभूमीतून झाला. लोकरंगभूमीचा जन्म लळीतातून झाला. लळीताचा जन्म भारुडातून झाला. भारुडाचा जन्म हरिकथेतून झाला तर हरिकथेचा जन्म भागवतातून झाला त्यामुळे भारुड ही भागवताची लोकपरंपरा आहे. संतांना आपले विचार समाजापर्यंत पोहोचवायचे होते त्यासाठी ते माध्यम शोधत होते. त्याच काळात वासुदेव, पिंगळा, पांगुळ असा सगळा वर्ग गावगाड्यामध्ये येत होता. यातून प्रबोधनाचे मोठे पर्व उभे राहिले. भारुडाला नृत्य, नाट्य, संगीत आदींची जोड मिळाल्यामुळे लोकरंगभूमीचे जनकत्व भारुडाकडे जाते. 

जगदीश मुळीक म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील महान संस्कृती आहे. यात आई, वडिल, गुरू यांना परमेश्वराचे स्थान दिले आहे. पूर्वापार असलेली लोकपरंपरा परकीयांच्या आक्रमणानंतरही टिकून आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत लोककलावंतांचेही मोठे योगदान आहे.

सूत्रसंचालन श्रीकांत जोशी यांनी केले. स्वागत विनायक आंबेकर, मंदार देवगांवकर यांनी तर आभार रामदास गावडे यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: