डॉ. आंबेडकर न्याय योजना म्हणजे…’बेनीफिट फॉर्म होम ‘ क्रांतीची सुरुवात : डॉ. नितीन राऊत
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) nविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाला लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबनी डॉट इन या वेबसाईटची सुरुवात आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. या वेबसाईटचे लोकार्पण करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसोबत आमदार अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, बीएमसी पावर लिमिटेडचे गिरीश चौधरी, पिक्सलस्टॅट (PIXELSTAT) चे संचालक महेश मोटकर , नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
राऊत म्हणाले, आमच्या एका पिढीने शासकीय कार्यालयात योजनांचा लाभ घेताना उंबरठे झिजवले आहे. मात्र, उंबरठे झिजवणे ही प्रशासनातील परंपरा हद्दपार झाली पाहिजे शासन आणखी गतिशील व्हावे, पारदर्शी व्हावे, जबाबदार व्हावे, अशी भूमिका या प्रकल्पामागे आहे. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे विशिष्ट काल मर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे.
महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला. ग्रामीण भागातील नागरिकांना तत्परतेने न्याय मिळावा. यासाठी ही योजना आणखी कामी येईल. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात याव्यात. तसेच तरुणांना अधिकाधिक या माध्यमातून न्याय मिळावा,अशी अपेक्षाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.
