महाबनी डॉट इन संकेतस्थळाचे थाटात लोकार्पण, घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा
नागपूर : शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) लोकार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना म्हणजे…”बेनीफिट फॉर्म होम” क्रांतीची सुरुवात असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
बेनीफिट फॉर्म होम याची संकल्पना कुणाल राऊत (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस), टेक्निकल सपोर्ट पिक्सलस्टॅट संस्था तसेच सहकार्य बी. एन. सी. पॉवर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा आज भव्य शुभारंभ झाला.
डॉ. राऊत म्हणाले, उंबरठे झिजवणे ही प्रशासनातील परंपरा हद्दपार झाली पाहिजे शासन आणखी गतिशील व्हावे, पारदर्शी व्हावे, जबाबदार व्हावे, अशी भूमिका या प्रकल्पामागे आहे. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे. या वेबसाईटचा शुभारंभ करण्यामागे कोरोना काळात ठप्प झालेले प्रशासन व लाभार्थी यांच्यातील वेदना असल्याचे सांगितले. कुणाल राऊत या माझ्या मुलाने अशा परिस्थितीतही शासन गतिशील राहू शकते. लाभार्थ्यांना देखील घरबसल्या त्यांचा नियमित लाभ मिळू शकतो. हे तांत्रिकदृष्ट्या आपल्याला पटवून सांगितले. त्यानंतर वर्षभर एक टिमच यासाठी कार्यरत आहे. आज प्रत्यक्षात सामान्य नागरिकांसाठी ही योजना कार्यरत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या लोकसेवा हमी कायद्याचा हा डिजिटल अविष्कार असून उपराजधानीत त्याची सुरुवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसोबत आमदार अभिजित वंजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, बीएमसी पावर लिमिटेडचे गिरीश चौधरी, पिक्सलस्टॅट (PIXELSTAT) चे संचालक महेश मोटकर , नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.