‘आर्ट मॅजिक’ मध्ये भारतीय आणि आधुनिक चित्रशैलीचा कलाविष्कार

पुणे : रंगांचा मुक्तहस्ताने वापर करीत साकारलेल्या निसर्गाच्या सुंदर छटा… विविध रंग आणि कुंदन वापरून तयार केलेले तंजोर चित्र… केवळ चित्राकडे पाहिल्याने ताणतणाव घालवणारे डुडल आर्ट… बारकाईने साकारलेले प्राण्याचे विविध भाव.. असा  कॅनव्हासवरील रंगीबेरंगी चित्रांचा अविष्कार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. चित्रकारांनी भारतीय चित्रशैली पासून आधुनिक चित्रशैलीतील  चित्रे अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहेत.

आर्ट मॅजिक संस्थेतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२२’ या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी चित्रकार जयप्रकाश जगताप, निखिल साखरे, स्वीकार फरांदे उपस्थित होते. महालक्ष्मी पवार आणि अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले असून अनुजा गुर्जर, ईश्वरी मते, कृतिका कामदार-शहा, रेहान बाबुडे, यज्ञेश हरिभक्त, सागर दारवटकर, आयुष कलभंडे, तनया गडाळे, रोहित काळे, आदिती काशीद, वेदिका इनामदार, प्राजक्ता कुलकर्णी, नीरज शहा, शर्वरी तांबे यांनी संयोजन केले आहे. आर्ट मॅजिक संस्थेचे हे १५ वे चित्रप्रदर्शन आहे. 

अॅक्रीलिक, ऑइल, वॉटर कलर या माध्यमातील चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. यामध्ये देवी देवतांची चित्रे, मोजेक आर्ट न्युज पेपर आर्ट, थ्री डी वास्तुकला, कॅलिग्राफी, चारकोल पेंटिंग अशी विविध चित्रे प्रदर्शनात आहेत.  

मुलांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये जोपासलेली चित्रकलेची आवड आणि त्यातून काढलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.  ज्यूनियर केजीतील मुलांपासून ते वयाच्या साठी पर्यंतच्या चित्रकारांची चित्रे हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय गृहिणी असणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी यांची चित्रे देखील प्रदर्शनात लक्ष वेधून घेतात. कर्णबधिर असलेल्या सायली कांबळे हिने काढलेली चित्रे पाहणे कलाप्रेमींसाठी निश्चितच पर्वणी ठरेल. बुधवार दि. २० एप्रिल पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत  प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: