fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपाय सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे बाबासाहेब सर्वकालीन मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही थांबता. काय करावे समजत नाही. त्यावेळी बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत  यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ या पुस्तकाचे आज वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमासाठी   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबई वरून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात होते. तर प्रमुख पाहूणे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जुन खरगे, अमेरीकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो.डॉ.केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम उपस्थित होते.

सामान्यता: राजाकरणातील व्यक्तीमत्व अभ्यास करून काही लिहिल याबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार वारस्याला पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांनी अभ्यासूपणे  बाबासाहेबांच्या विचारांवर पुस्तक लिहून राजकारणी अभ्यासू असतो हे दाखवून दिले आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व व मंत्रीमंडळातील सहकारी म्हणून नितीन राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांचे विचार कायम उपाय सुचवित असते. यापुस्तकात देखील त्यांनी लोकसंख्येसंदर्भातील विचारांची, धोरणांची  माहिती  दिली आहे. नितीन राऊत हे बाबासाहेबांचे भक्त आहेत. त्यांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाही.  ते अंधभक्त नाहीत. बाबासाहेबांचे  विचार घेवून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची त्यांची भुमिका कौतुकास्पद, आहे अशा शब्दात या साहित्य निर्मीतीचा त्यांनी गौरव केला.

राज्यसभेतील पक्षनेते  मल्लीकार्जुन खरगे यांनी आज नागपूरकर जनतेपुढे या पुस्तक प्रकाशनाच्या निमीत्त्याने आपल्या दिर्घ राजकीय वाटचालीचा आढावा दिला. नागपूर भूमी प्रेरणास्थान असल्याचे स्पष्ट केले. नागपूरकरांच्या परिवर्तनाचा संपूर्ण देशाला फायदा झाला आहे. बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्राणची भूमिका 1938 मध्ये मांडली. त्या भुमिकेची अंमलबजावणी 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली. हे दोन्हीही नेते किती द्रष्टे होते. हे लोकसंख्या निर्णयावरील त्यांच्या भूमिकेने स्पष्ट होते. यावेळी त्यांनी डॉ. नितीन राऊत यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडतांना देशभर आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांची बांधणी केल्याबद्दल कौतुक केले.

अमेरीकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो.डॉ.केविन डी. ब्राऊन यांनी दिक्षाभूमी येथे जाऊन दर्शन घेतल्याचे सर्वप्रथम सांगितले. भारत आणि अमेरिका यादोन्ही देशात वर्णभेद आणि जातीभेद यासमस्यांनी अनेक पिढ्यांचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याविरोधात उभा केलेला लढा केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक असून भारताच्या लोकसंख्येच्या प्रश्नावर देखील त्यांनी उपाय योजना सुचवल्या आहे. एका चांगल्या विषयाला पुस्तकात हातळल्याबद्दल त्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्या पुस्तकाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मानव जातीच्या समस्येच्या कोणत्याही प्रश्नावर उपाय योजना सुचविण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात असल्याचे सांगितले.

तत्पुर्वी पुस्तकाचे लेखक डॉ. नितीन राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. लोकसंख्येच्या समस्ये संदर्भात बाबासाहेबांनी केलेले सुतोवाच लक्षात घेतले गेले नाही.  त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसंख्या नियंत्रणावर 70 च्या दशकात धाडसी निर्णय घ्यावे लागले. बाबासाहेबांनी सुचवलेल्या मार्गंनी निर्णय घेतल्यामुळे 1950 च्या काळात 1 लाख मुलांच्या जन्मामागे 1 हजार महिलांचा प्रसूती दरम्यान वा पश्चात मृत्यु होत होता. मात्र आता दोन अपत्यांचा निणर्य घेतल्यामुळे ताजा आकडेवारीनुसार ही संख्या एक लाखाला 103 पर्यत कमी झाली आहे. बाबासाहेबांची पुढील वर्षी 132 वी जयंती साजरी करतांना अल्पउत्पन्न गटातील दारीद्य रेषेखालील कुटुंबानी एक अपत्यापर्यंत आपले कुटुंब सिमीत ठेवल्यास एक रकमी प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना सुरू करण्याबाबत शासनाकडे आग्रह करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडण्याच्या घटनेला 84 वर्षपूर्ण होत आहेत. त्याची आठवण म्हणून हे वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करण्यातबाबत मागणी असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रदिप आगलावे यांनी यावेळी या पुस्तकावर समिक्षण सादर केले.   डॉ. नितीन राऊत  यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ हे पुस्तक त्यांच्या पीएचडीच्या संशोधनावर आधारीत आहे. लोकसंख्येचा विस्फोट संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंडीपेडंट लेबर पार्टीच्या जाहिरानाम्यात चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात बाबासाहेबांनी 10 नोव्हेबर 1938 रोजी मुंबई विधानसभेत बिल  सादर केले होते. त्याला प्रचंड विरोध झाला. परंतू नंतर बाबासाहेबांच्या धोरणांचाच भारताने पुरस्कार केला.  गर्भनिरोधक हा महत्वाचा उपाय त्यांनी सुचविला होता. भारताची लोकसंख्या 1921 पासूनच्या जनगणनेचा आधार घेतल्यास कधीच कमी झाली नाही. सतत वाढत गेली आहे. यासगळया वस्तुस्थितीची मागणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंब नियंत्रणाच्या संदर्भातील दृष्टीकोन आजच्या काळात देखील महत्वपुर्ण आणि प्रासंगिक आहे. असे या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading