वारसा स्थळांचे जतन व संवर्धनाकरीता लोकसहभाग गरजेचा

सेव्ह हेरिटेज चळवळी अंतर्गत वारसा जागर चर्चासत्र ; हेरिटेज क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांची उपस्थिती

पुणे : वारसा स्थळांबाबत अनेक अडचणी आहेत. मात्र, त्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण पुणेकर म्हणून काय करु शकतो, याविषयी आखणी करणे गरजेचे आहे. पुण्यातील वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक वाडे, पर्यटन स्थळांचा समावेश असून अशा २५० हून अधिक वास्तू आहेत. प्रामुख्याने तेथील स्वच्छता, स्वच्छतागृह आणि इतर सुविधांबाबत असलेल्या अडचणी दूर व्हायला हव्यात. त्यामुळे त्या वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याकरीता लोकसहभाग गरजेचा असल्याचा सूर वारसा जागर चर्चासत्रामध्ये उमटला.

सेव्ह हेरिटेज चळवळी अंतर्गत जागतिक वारसा दिनानिमित्त पुणे शहरात हेरिटेज क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांचे प्रतिनिधी, अभ्यासक, प्रशासन, वारसा प्रेमींकरीता पत्रकार भवन येथे वारसा जागर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्र.के.घाणेकर, सुधन्वा रानडे, शाम ढवळे, शाहीर हेमंतराजे मावळे, डॉ.श्रीकांत गबाले, आयोजक स्वप्नील नहार, मंजिरी भालेराव, आनंद कानिटकर यांसह हरिटेज क्षेत्रात कार्यरत संस्था व तज्ज्ञ उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या अंतर्गत अनेक वारसा स्थळे आहेत. त्यामुळे पुणे मनपातील यासंबंधीच्या विभागावर वारसा स्थळांशी निगडीत अडचणींसंदर्भात एक दबावगट उभा राहण्याची गरज आहे. ती गरज या सेव्ह हेरिटेज चळवळीतून पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी वारसा प्रेमींनी केला. तसेच वारसा स्थळांबाबत नागरिकांचा जाहीरनामा काढून त्यातील मुद्यांबाबत पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.

विश्रामबागवाडा, नानावाडा यांसह अनेक ऐतिहासिक वास्तू ठिकाणी विविध सोयी-सुविधा व उपक्रम राबविले जात होते. ते आजमितीस बंद आहेत. त्यामुळे ते पुन्हा चालू करुन वारसा स्थळे अधिक समृद्ध करण्याकरीता एक आराखडा देखील आखण्याचा निर्धार हा चर्चासत्रात करण्यात आला. अनेक वाडे आजही उत्तम अवस्थेत असून ते जगभरात पोहोचविण्याकरीता थ्री डी व्हर्च्युअल माध्यमाचा वापर कसा करता येईल, याची चर्चा देखील यावेळी झाली.
प्रशासन आणि वारसा संस्था यांचा वारसा प्रश्नावर समतोल साधण्याचा प्रयत्न भविष्यात सेव्ह हेरिटेज चळवळीच्या माध्यमातून भविष्यात केला जाईल, असे सेव्ह हेरिटेज चे स्वप्नील नहार यांनी सांगितले. हेरिटेज विभागाचा कारभार शाश्वत प्रकारे झाला पाहिजे, हा सूर बैठकीत उमटला.

Leave a Reply

%d bloggers like this: