श्रीराम मंदिरात ‘लळीत पायघड्यांचा’ सोहळा उत्साहात 

पुणे : श्रीराम जय राम जय जय रामचा अखंड गजर… आणि कीर्तनाने प्रसन्न झालेल्या भक्तीमय वातावरणात तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पांढ-या कापडावरील प्रभू श्रीरामांच्या पावलांवर भाविकांनी फुलांची उधळण करीत पायघड्यांचे दर्शन घेतले. श्रीरामजन्मानंतर तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांचा सोहळा साजरा केला जातो. संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा होतो, हे विशेष.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांच्या सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण तुळशीबागवाले कुटुंबातील सदस्यांनी पायघड्यांचे कीर्तन केले. तसेच कुटुंबातील सदस्य व संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

सोहळ्याला संस्थानचे उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे. यावेळी उत्सवकाळातील मानक-यांचा सन्मान देखील करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे यांचे कीर्तनही झाले.

रामदास तुळशीबागवाले म्हणाले, श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो. नविन पांढ-या शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभा-यापासून सभामंडपापर्यंत आणले जाते. यावेळी लळीत पायघड्यांचे कीर्तन करण्यात येते. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सोहळ््यानंतर उत्सवकाळातील मानक-यांचा पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात येतो, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: