चतु:शृंगी देवी मंदिराचा होणार जीर्णोद्धार

पुणे : चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगतगुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. १६ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती चतु:शृंगी देवस्थानचे अध्यक्ष नितीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त हेमंत अनगळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य मंदीर, सभामंडप, आजुबाजुच्या भाग आणि कळस यांचा समावेश असणार आहे. या साठी साडेतीन कोटी रुपये खर्च येणार असून, सुमारे दीड वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. सुमारे सहा हजार ७०० चौरस फूटाचे नवीन बांधकाम होणार आहे. देवीचा गाभार्यात बदल केले जाणार नाहीत. सभामंडप सहा फूटाने मोठा होणार आहे.

पुरातत्व खात्याच्या मान्यतेनुसार मंदिराची जुनी मराठा शैली किंवा पेशवे शैली कायम असणार आहे. बांधकाम सुरू असताना भाविकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात भाविकांची सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात गणपती मंदीर, आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण, धबधबा, उद्यान, ध्यानमंदिराचा समावेश असणार असून, तिसर्या टप्प्यात सांस्कृतिक कार्यालय, नवीन कार्यालयाची इमारत, सरकता जिना यांचा समावेश असणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, भाविकांनी देणगी द्यावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी chatturshringidevasthanpune.org या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

चतु:शृंगी देवीचे मंदिर पेशवकालीन आहे. सप्तशृंगीचे परमभक्त पेशव्यांचे सावकार दुर्लभशेठ यांना वय झाल्यामुळे वणी, नाशिक येथे दर्शनाला जाणे अशक्य झाले. तेव्हा देवीने दृष्टांत देऊन या ठिकाणी उत्खनन करायला सांगितले. ही देवी चार डोंगराच्यामध्ये असल्याने तिला चतु:शृंगी असे नाव मिळाले. कालांतराने दुर्लभशेठ यांच्या नातवाने देखभाल करण्यासाठी दस्तगिर गोसावी यांच्या ताब्यात मंदिर दिले. १८२० मध्ये ते अनगळ कुटुंबियांकडे आले. मंदिराच्या परिसरातील १६ एकर जागा अनगळांनी विकत घेतली. नवरात्रीत मोठी यात्रा भरते. पुणे शहराची अधिष्ठात्री म्हणून या देवीची ओळख आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: