नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाने पटकाविला प्रथम क्रमांक

छत्रपती श्री शिवाजी महाराज ३ री राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा 

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज ३ रे राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नांदेडच्या नारायण चव्हाण विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, विकास गोगावले, जगदीश जेधे, धनाजी जेधे, शेखर शिंदे, कमल व्यवहारे, अॅड. तानाजी घारे, अॅड. सचिन शिंदे, प्राचार्य डाॅ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या हस्ते झाला.

पिंपरीच्या एस. एन. बी.पी. विधी महाविद्यालयाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. डी.ई.एस.महाविद्यालयाच्या मुस्कान कालरा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी वकील (वादी) हा किताब पटकाविला तर सिद्धांत भानावत हा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी वकील (प्रतिवादी) ठरला. श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाची नम्रता वाघमारे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

प्रसन्न वराळे म्हणाले, संविधान हे सर्व कायद्याचे मूलतत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले, आपल्याला मिळालेला तो मोठा आधार आहे. आपल्या न्याय व्यवस्थेचे मूलसूत्र संविधान आहे. वकिलीचा अभ्यास करणाऱ्यांनी धंदा आणि व्यवसाय यामध्ये गल्लत करू नका. आपल्या व्यवसायाचे पावित्र्य राखा. निपक्ष न्यायमूर्ती केवळ कायद्याच्या आधारावर न्याय देतात, असेही त्यांनी सांगितले.

सुधीरकुमार बुक्के म्हणाले, वकिली करताना प्रामाणिकपणा, धैर्य या गोष्टी वकीलामध्ये असणे आवश्यक आहे. न्यायाधीश बनणे सोपे आहे, परंतु चांगला वकील बनणे हे अवघड आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट निवडू नका, मेहनत करा, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: