संतूरवादनातून रसिकांना दैवी स्वरांची अनुभूती

पुणे : चैत्र पाडव्यानंतर रंगाची उधळण करत बहरलेली वृक्षवल्ली, सकाळच्या प्रहरी सर्वत्र दरवळलेला मोगर्‍याचा सुगंध या रम्य वातावरणात दैवी स्वरांची अनुभूती आज पुणेकर रसिकांना मिळाली. निमित्त होते ते पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या संतूरवादन मैफलीचे!

स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफलीत आज पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूरवादन झाले. गोखले इन्स्टिट्यूच्या आवारात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली ही मैफल रंगली. प्रभातस्वर मैफलीचे आजचे दहावे पुष्प होते. प्रथितयश कलाकारांचे गायन, वादन आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद असे या मैफलीचे स्वरूप असते. मैफलीला रसिकांनी नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सुरुवातीला पंडित व्यास यांनी संतूर या वैशिष्ट्यपूर्ण वाद्याची ओळख करून दिली. 20व्या शतकात काही दिग्गज कलाकारांनी अनेक राग रचले, त्याला लोकमान्यताही मिळाली त्यातील भारतरत्न पंडित रविशंकर यांनी रचलेल्या राग ‘परमेश्वरी’ने पद्मश्री पंडित सतीश व्यास यांनी वादनाची सुरुवात केली.

आलाप, जोड, झाला त्यातील तीन रचना, विलंबित झपताल, मध्य लयीतील तीनताल आणि द्रुत एकतालात सादरीकरण केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीचा रसिकांनी आनंद घेत सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात साथ दिली. भैरव आणि भैरवी रागांचे मिश्रण असलेल्या बसंत मुखारी या रागातील बंदिश मैफलीच्या उत्तरार्धात पेश केली. सूर्याची किरणे झाडांमधून डोकावू लागल्यानंतर पंडितजींनी, ब्रेकफास्टची वेळ झाली आहे, मैफल थांबवायची का अशी विचारणा केली असता, आपली मैफलच आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे, असे उत्स्फूर्तपणे सांगून रसिकांनी मैफल पुढे सुरू ठेवण्याची आग्रहाची विनंती केली.

प्रत्येक मैफल ही कलाकारासाठी परीक्षाच असते. सगळे काही जुळून आले तर मैफल रंगते, असा अनुभव विषद केल्यानंतर वडिल गायक असूनही आपण वादनाकडे कसे वळलात या प्रश्नाला उत्तर देताना पंडित सतीश व्यास म्हणाले, एकदा वडिलांबरोबर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या मैफलीला जाण्याचा योग आला. ते वाद्य आवडल्याने संतूरवादन शिकायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. परंतु वडिलांनी लौकिक शिक्षणाचा आग्रह कायम ठेवून संतूरवादन शिकण्याची परवानगी दिली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना मला संतूर वादनाचे शिक्षण देण्याची विनंती केली. पंडितजींनी ती तत्काळ मान्य केली आणि माझ्या संतूरवादनाच्या शिक्षणाला सुरुवात झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: