‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटातून अभिनेता सागर संतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
बॉलीवूड दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना ट्रीब्युट अशी टॅगलाईन असलेल्या ‘दिल, दिमाग और बत्ती’या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून अभिनेता सागर संत हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. एकांकिका स्पर्धेत चमकल्यानंतर हिंदी शॉर्ट फिल्मच दिग्दर्शन अन् आता मराठी चित्रपटात अभिनय असा सागर संतचा प्रवास आहे.
‘दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाबद्दल बोलताना सागर म्हणतो, मनमोहन देसाई यांचा एक वेगळा एरा आहे. ज्यांच्या चित्रपटात इमोशन, अॅक्शन याचं पॅकेज असायचं. त्यांना ट्रीब्युट म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्याला स्वतःची अशी एक स्टोरी आहे जी विनोदांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. ही एक पॅरडी आहे. ज्यात इलॉजीक हेच लॉजीक आहे. यामध्ये माझी एका महत्वाकांक्षी युवकाची भूमिका आहे. जो अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत असतो.
सहकलाकारांविषयी बोलताना सागर संत म्हणाला, ऑन कॅमेरा तर आमचं ट्यूनिंग चांगल होतं. शिवाय ऑफ कॅमेरा सुद्धा आम्ही खूप मजा केली. शूटिंग व्यतिरिक्त मिळालेल्या वेळात गप्पा व्हायच्या त्यातुन दिलीप प्रभावळकरांकडून खूप काही शिकायला मिळालं. ते बोलके आहेत. त्यामुळे बोलता बोलता ते नकळतपणे आपल्याला खूप काही देउन जातात. सोनाली कुलकर्णी या अनुभवाने माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. पण त्यांच्यासोबत काम करताना त्या समोरच्याला समजून घेवून काम करतात.
दिग्दर्शक ऋषिकेष गुप्ते हे लेखक म्हणून तर मोठे आहेतच. पण दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांचे व्हीजन कमालीचे आहे. ‘दिल, दिमाग और बत्ती’ हा चित्रपट शूट करणं हे एक शिवधनुष्य होत. पण त्यांनी ते लिलया पेललं आहे. या चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिण्यापासून इतक्या सगळ्या कलाकारांना सांभाळून घेणं हे कसरतीच काम होतं पण त्यांनी ते जमवलं. मला अभिनेता म्हणून माझी स्पेसही दिली.
पुण्याविषयी बोलताना सागर म्हणाला, नाटक असो का चित्रपट एखादी गोष्ट पुण्यापासून सुरू झाली की ती चांगलीच होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना हे अधिक ठळकपणे जाणवते. मी मराठी, हिंदी सोबतच तमिळ लोकांबरोबर काम केले आहे आणि मला खूप चांगला अनुभव आला, मला कामाच्या शैलीत फरक दिसला. मराठीमध्ये काम करताना होमली अॅटमॉसफियर असत. पण सर्वत्र काम करण्याची पद्धत, चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे.