महिला कलाकारांच्या गायन आणि वादन कलाविष्कारास रसिकांची दाद

पुणे : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…रखुमाई रखुमाई…अविरत यावे ओठी नाम श्रीराम जयराम जय जय राम…भजनी राम नयनी राम…अशी एकाहून एक सरस भक्तीगीते सादर करीत गायिका संपदा वाळवेकर यांनी आपल्या आवाजातील राम नामाच्या गजराने वातावरण प्रसन्न केले. महिला कलाकारांच्या गायन आणि वादनाच्या कलाविष्कारास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गायिका संपदा वाळवेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम मंदिरात झाला. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातील संपदा वाळवेकर सादर केलेल्या हंसध्वनी रागातील विविध लयकारी आणि स्वरविस्तारास रसिक श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. वैष्णवी जोशी (बासरी), अंजली शिंगडे ( व्हायोलिन), आदिती गराडे (संवादिनी), आश्विनी रेंघे (तबला), गार्गी शेजवळ (पखावज), संध्या साठे (तालवाद्य) या सर्व महिला वादकांनी समर्पक साथ देत आपली कला सादर केली. कार्यक्रमाची सांगता ‘कोमल वाचा दे रे राम’ या भैरवीने झाली. यावेळी संपदा वाळवेकर यांच्या शिष्या रमा जोगदंड, स्वराली राजपूरकर आणि अवनी भाले यांनीही आपल्या गोड गायनाने रसिकांची दाद मिळवली.

Leave a Reply

%d bloggers like this: