S. Balan Trophy – एमईएस इलेव्हन संघाला विजेतेपद !

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघाने गेम चेंजर्स इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुभम हरपाळे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने गेमचेंजर्स इलेव्हन संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले. गेमचेंजर्स इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२६ धावा धावफलकावर लावल्या. शुभम रांजणे (४३ धावा) आणि अझीम काझी (३९ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. एमईएस संघाच्या शुभम हरपाळे (३-२४), आयुश काब्रा (२-१५) आणि दिपक डांगी (२-२३) यांनी अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या धावांना वेसण घातली.

एमईएस इलेव्हन संघाने हे आव्हान १९ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. हर्ष संघवी (३९ धावा), रोहीत हाडके (२२ धावा) आणि सुजित उबाळे (१३ धावा) यांनी संघासाठी उपयुक्त धावा करून दिल्या व विजेतेपदाला गवसणी घातली. शुभम हरपाळे याला अंतिम सामन्याचा सामनावीर किताब देण्यात आला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या ग्रुपच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन, सिनेचित्रपट अभिनेते सौरभ गोखले आणि अनुजा साठे-गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

विजेत्या एमईएस इलेव्हन संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या गेमचेंजर्स इलेव्हन संघाला ५१ हजार रूपये व करंडक देण्यात आला. या शिवाय वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू नौशाद शेख याला २१ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फलंदाज हर्ष संघवी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज नौशाद शेख यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आली.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः अंतिम सामनाः
गेमचेंजर्स इलेव्हनः १८.२ षटकात १० गडी बाद १२६ धावा (शुभम रांजणे ४३, अझीम काझी ३९, शुभम हरपाळे ३-२४, आयुश काब्रा २-१५, दिपक डांगी २-२३) पराभूत वि. एमईएस इलेव्हनः १९ षटकात ६ गडी बाद १२९ धावा (हर्ष संघवी ३९, रोहीत हाडके २२, सुजित उबाळे १३,अझीम काझी २-१३); सामनावीरः शुभम हरपाळे;

Leave a Reply

%d bloggers like this: