अंधाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालाची नोंद

पुणे : महाराष्ट्राच्या आर्यन जोशीला(२.५) तामिळनाडूच्या अनुभवी मारीमुथुने (२. ५) बरोबरीत रोखून सावा हर्बल अंधाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या मिलिंद सामंत सह ५ खेळाडू प्रत्येकी ३ गुणांसह आघाडीवर आहेत. गेली सहा वर्षे अजिंक्य असणाऱ्या किशन गंगोली ने आपल्या कर्नाटक संघातील सहकारी शशिधरला सहजी हरवले.

आर्यन ने डावाच्या सुरुवातीलाच आपले एक प्यादे घोडचूक करून गमावले आणि मारीमुथुच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु आर्यन ने कडवी लढत देऊन आणि मारीमुथुच्या चुकांचा फायदा घेत ३४ चालींनंतर डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. आर्यन ने डावाची सुरुवात स्लाव्ह प्रकाराने केली होती.

अनुभवी किशन गंगोली ने आपल्या सलग सातव्या राष्ट्रीय विजेतेपदाकडे वाटचाल करताना शशिधर ला जराही संधी दिली नाही. शशिधरने आपले एक प्यादे सुरुवातीला गमावले आणि त्यानंतर पद्धतशीर खेळून किशन ने ४५ खेळीत विजय खेचून आणला.  मिलिंद सामंत ने काळ्या सोंगट्यांकडून खेळताना ग्रुनफेल्ड बचावाची सुरुवात केली आणि हळूहळू गोपी च्या मोहऱ्यांची कोंडी केली . गोपीने वजीर देऊन कोंडीतून सुटण्याचा प्रयत्न केला परंतु मिलिंद ने पांढऱ्या राजावर आक्रमण करून ४४ खेळीत डाव जिंकला.

अग्रमानांकित दर्पण इनानीला (१. ५) अजून त्याचा सूर गवसलेला नाही. काल दिल्लीच्या सोमेनदार विरुद्ध हरलेला दर्पण आज मध्य प्रदेश च्या सूर्यप्रताप सिंग ला पराभूत करू शकला नाही . स्लाव्ह बचावाच्या झालेल्या या लढतीत सूर्यप्रताप ने आरामात बरोबरी साधली.

संपूर्ण भारतातून ५५ खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अटीतटीने झुंजत आहेत. चीन, मॅसेडोनिया आणि फ्रान्स येथील आंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ उतरणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: