डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि अल्बोट टेक्नॉलॉजीज यांच्या पुढाकाराने न्युक्लिअर फ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन

पुणे : डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी, पुणे आणि अल्बोट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट संलयन’ या प्रकल्पाअंतर्गत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात न्युक्लिअर फ्युजन तंत्रज्ञानाद्वारे संशोधनाला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथील नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार डॉ. आकाश सिंह यांनी आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत या संशोधन प्रकल्पाची घोषणा केली. या निमित्ताने ज्याच्या पुढाकाराने शिक्षणसंस्था आणि उद्योगक्षेत्र एकत्र येऊन अणुऊर्जा क्षेत्रात संशोधन करत आहेत, असे डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे पहिले खासगी विद्यापीठ ठरले आहे.
या प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रभात रंजन काम पाहात असून या प्रकल्पाविषयी माहिती देताना ते म्हणाले, “ न्युक्लिअर फ्युजन तंत्रज्ञानाच्या मदतीने अणुऊर्जा निर्मिती करण्यात या प्रकल्पाचा मोठा उपयोग येत्या काळात होऊ शकणार आहे. शिवाय, थोरिअमचे युरेनियममध्ये रुपांतर करून न्युक्लिअर एनर्जी निर्मितीसह वैद्यकीय समस्थानिके (मेडिकल आयसोटोप) तयार करण्यास सक्षम असा कॉम्पॅक्ट व्हॉल्युम न्यूट्रॉन स्रोत प्रदान करणारा अशा प्रकारचा हा पहिलाच खासगी उपक्रम आहे. तसेच यामुळे अणू कचरा (न्युक्लिअर वेस्ट) व्यवस्थापन करणेही शक्य होणार आहे.”
“स्वच्छ आणि शाश्वत पद्धतीने वीज निर्मिती करणे, हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. ऊर्जा उत्पादन करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या अप्लिकेशनसाठी न्युक्लिअर फ्युजनद्वारे तयार केलेल्या न्युट्रॉनचा वापर करण्याचे आमचे ध्येय आहे.
तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही कमी गुंतागुंत, कमी खर्च आणि प्रभावी कार्यप्रणालीवर आधारित सिस्टिम बनवण्यावर भर देत आहोत. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प याआधी अनेकदा चर्चिला गेला असला, तरी आतापर्यंत प्रायोगिकदृष्ट्या तो साध्य झालेला नाही,” असेही प्रा. रंजन यांनी सांगितले.
न्युक्लिअर फ्युजन तयार होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सूर्याच्या गाभ्याच्या सुमारे ६ ते १२ पट तापमान तयार करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला जाणार आहे. गेल्या काही दशकांपासून जगभरात यासाठी प्रयत्न सुरू असून आतापर्यंत या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण करणे कुणालाही शक्य झालेले नाही. ‘डीवायपीआययू‘मध्ये शास्रज्ञ आणि अभियंत्यांची एक पूर्णवेळ टीम यासाठी सिस्टीम डिझाइन आणि विकसन करण्यासाठी काम करत आहे. प्रकल्पाचे स्वरुप पाहता मुख्य प्रायोगिक उपक्रम विद्यापीठाच्या आवारात न घेता औद्योगिक क्षेत्राबाहेर राबविले जाणार आहेत. यासाठी टीमला नियोजन आणि डिझाइन तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच मॉडेल तयार करण्यासाठीदेखील सुविधा येथे देण्यात आल्या आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स चे माजी विद्यार्थी आणि अल्बोट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार डॉ. आकाश सिंह म्हणाले, “आम्ही या प्रकल्पासाठी १दशलक्ष डॉलर्सचा प्रारंभिक निधी उपलब्ध करून दिला आहे. हा प्रकल्प दीर्घकालीन असून याचे उद्दिष्ट आणि परिणाम साध्य करण्यासाठी सुमारे १५ वर्षांचा कालावधी लागू शकत. प्रकल्पाचे काम जसे पुढे जाईल तशी त्यासाठी २०० ते ३०० दशलक्ष डॉलर्स निधीची गरज भासेल. त्यासाठी आम्ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याचा विचार करीत आहोत. जे यांसारख्या दीर्घकालीन आणि मोठ्या पातळीवरील प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देतात. हा प्रकल्प संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार असून यामुळे ऊर्जा, सुरक्षा आणि आरोग्य यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण होतील. या प्रकल्पाच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे.”
न्युक्लिअर फ्युजन क्षेत्रात करणार ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक, दहा हजार नोकऱ्या होणार निर्माण
येत्या तीन वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असून, संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सुमारे दहा हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे डॉ. सिंह यांनी नमूद केले.
हे आहेत या प्रकल्पाचे उपयोग-
1.येत्या १५ वर्षांत ५०० मेगा वॉट एवढ्या ऊर्जेची निर्मिती
2.सुरक्षित स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात ऊर्जानिर्मिती शक्य
3.वैद्यकीय क्षेत्रालाही फायदा
4.थोरियम चे रूपांतरण युरेनियम मध्ये करणे शक्य
5.शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जेसाठी महत्त्वाचे पाऊल

Leave a Reply

%d bloggers like this: