१० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे : पी. एम. शाह फाउंडेशनच्यावतीने १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ व ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता येथे हा चित्रपट महोत्सव होणार असून प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवात आरोग्य विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय लघुपट व माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.

पी. एम. फाउंडेशनच्या वतीने २००९ सालापासून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोविड महामारीमुळे मागील दोन वर्षे हा चित्रपट महोत्सव घेण्यात आला नव्हता. यंदा महोत्सवाचे दहावे वर्ष असून या दोन दिवसांत ४९ लघुपट व माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. शुक्रवारी (८ एप्रिल) रोजी दुपारी २ वाजता पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत चित्रपट दाखविण्यात येतील.

दुसऱ्या दिवशी शनिवारी (९ एप्रिल) रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यानंतर ४.३० वाजता महोत्सव समारोप कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथकनकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी लघुपट आणि माहितीपट या दोन्ही विभागांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या महोत्सवासाठी जगभरातून शंभरहून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ४९ चित्रपटांची निवड करण्यात आली. यामध्ये १३ चित्रपट विविध देश आणि भाषांमधील असून ३६ चित्रपट भारतातील विविध राज्यांतील आहेत. साधारण वीस ते तीस मिनिटे कालावधी असलेले हे चित्रपट मानसिक आरोग्य, बाललैंगिक शोषण, कोविड, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, अवयवदान, कर्करोग, आरोग्य आणि पर्यावरण या वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. मराठी, बंगाली, हिंदी, इंग्रजी, तमिळी, मणिपुरी, मल्याळम, फ्रेंच, फारशी, बलोची यांसारख्या भाषांमधील लघुपट व माहितीपट या महोत्सवात सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: