fbpx

कला आणि संस्कृती हे राष्ट्राचे मज्जारज्जू – अभिनेते पद्मश्री मनोज जोशी

पुणे : राष्ट्राचे आणि समाजाचे चारित्र्य तपासायचे असेल तर त्याची कला आणि संस्कृती काय आहे हे पहायाला हवे.  कला आणि संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे कला आणि संस्कृतीची जपणूक व्हायला हवी.  कला आणि संस्कृती राष्ट्राचे मज्जारज्जू आहेत, असे मत अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांनी व्यक्त केले.

संस्कार भारती पश्चिम प्रांत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. या वेळी कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी सुचेता भिडे- चापेकर, स्वाती दैठणकर, केशव गिंडे, अनिरुद्ध देशपांडे, रवींद्र वंजारवाडकर, प्रमोद कांबळे, अभय भंडारी, दिलीप क्षीरसागर, अतुलकुमार उपाध्ये, संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विनी दळवी, पश्चिम प्रांत अध्यक्ष उस्मान खां, महामंत्री सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. तसेच उद्घाटनानिमित्त पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन झाले.

मनोज जोशी म्हणाले,  भारतीय सनातन संस्कृतीत वेद, पुराण, उपनिषदे, आरण्यके हे जीवन मूल्य आहेत ज्याने आपला समाज संचलित होतो. नवीन येणाऱ्या शिक्षणपद्धतीत बऱ्याच गोष्टी बदलतील. ज्यामुळे भारत विश्वगुरू म्हणून यापुढेही राहील.  नवीन पिढीला वाचायला शिकविले पाहिजे त्यांना आपली संस्कृती आणि कला कळली पाहिजे. कला ही संस्कृतीची वाहिका आहे आणि कलेचा प्राण रसात्मकता आहे.

अश्विन दळवी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारती या दोन्ही संस्थांचे मार्ग वेगळे असले तरी कार्य एकच आहे.  राष्ट्राच्या प्रगतीसाठी संस्कार भारती अखंड प्रयत्नशील आहे. देशाला त्याचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी या संस्था काम करतात. कला आणि संस्कृतीच्या मार्गाने जाऊन देशाचे वैभव मिळविण्यासाठी संस्कार भारती काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सतीश कुलकर्णी म्हणाले, संस्कार भारतीच्या कलासाधक, संगीत विशारद सरिता महाजन यांनी आपले राहते घर दि. ६ एप्रिल १९९२ रोजी मृत्युपत्राद्वारे संस्कार भारतीला दान दिले त्यांच्या इच्छेनुसार या वास्तूमध्ये संस्कार भारतीचे कार्यालय थाटले गेले. बैठका, साधना वर्ग, कला साहित्य, वाद्य पुस्तके अशा विषयांसाठी ही वास्तू उपयुक्त ठरली. या इमारतीचे नूतनीकरण होऊन संस्कार भारती पश्चिम प्रांताचे सुसज्ज कार्यालय झाले आहे. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: