पुणे सार्वजनिक सभा ही भारताच्या संस्थात्मक जीवनाच्या वाटचालीतील मैलाचा दगड
विश्वकोश समितीचे अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत

पुणे : प्रत्येक संस्था मोठी असते. परंतु भारताच्या आधुनिक इतिहासात पुणे सार्वजनिक सभा या संस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तत्त्वज्ञानाचे अनेक प्रवाह आले. लोकशाही, राष्ट्रवाद आणि आधुनिकता यांचे तत्वज्ञान आणि त्यातून झालेल्या प्रबोधनाचे फलित म्हणजे पुणे सार्वजनिक सभा. भारतामध्ये ज्यावेळी संस्था निर्माण होत होत्या, त्या काळातील संस्थात्मक जीवनाच्या वाटचालीतील ही संस्था मैलाचा दगड आहे, असे मत विश्वकोश समिती अध्यक्ष राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

ग. वा. जोशी तथा सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेल्या पुणे सार्वजनिक सभेला १५० वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या १५० वर्षातील इतिहासाचे, महत्त्वाच्या घडामोडींचे संकलन ‘इतिहास स्मृतीगंध’ या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार पेठेतील पुणे सार्वजनिक सभेच्या संस्थेत झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, पुस्तकाचे लेखक संकलक डॉ. आनंद दामले, दिलीप पुरोहित, प्रकाश दाते, सुरेश कालेकर, शरद गर्भे, अनिल शिदोरे उपस्थित होते. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या संस्थेच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

राजा दीक्षित म्हणाले, पुणे सार्वजनिक सभेने सर्वांगीण सुधारणा अंगीकारली आणि संस्थात्मक राजकारण पुढे आणले. १५० वर्षे पूर्ण केलेल्या या संस्थेची अर्थपूर्णता या पुढेही अशीच टिकून राहावी. ज्या प्रेरणेतून संस्था निर्माण झाली ती प्रेरणा धगधगत ठेऊन संस्थेचे कार्य पुढे न्यावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. आनंद दामले आणि विद्याधरपंत नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. भरत साबळे यांनी सूत्रसंचालन केले.अनिल शिदोरे यांनी प्रास्ताविक केले. शरद गर्भे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: