Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

गुढीपाडव्यानिमित्त तुळशीबागेतील राम- लक्ष्मण- सीता मूर्तीस पवमान अभिषेक

पुणे :श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त, पुरूषसूक्त पठण आणि रामायण वाचनाच्या स्वरांचा निनाद अशा मंगलमय वातावरणात तुळशीबागेतील पेशवेकालीन राममंदिरात राम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने मंगळवार, दिनांक १९ एप्रिल पर्यंत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी सकाळी मूर्तीस अभ्यंगस्नान, पवमान अभिषेक, मंत्रपठण यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.

रामदास तुळशीबागवाले म्हणाले, गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान होणा-या श्रीरामजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण सभामंडप व मंदिर परिसरात झुंबरे लावण्यात आली आहेत. उत्सवांतर्गत दररोज रामायण वाचन, श्रीरामांची महापूजा व आरती, तसेच सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तसेच भक्तीप्रवचन, सांगितीक कार्यक्रम, कीर्तन, भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवोदितांसह दिग्गज कलाकारांची गायन व वादनसेवा
उत्सवादरम्यान दररोज रात्री ८.३० वाजता मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री गायिका सावनी दातार व शिल्पा पुणतांबेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक ५ एप्रिल रोजी संपदा वाळवेकर व सहका-यांचे गायन, दिनांक ६ एप्रिल रोजी आनंद भीमसेन जोशी, दिनांक ७ एप्रिल रोजी प्रख्यात गायक आनंद भाटे, दिनांक ८ एप्रिल रोजी चैत्राली अभ्यंकर व शशांक दिवेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच, दिनांक ९ एप्रिल रोजी हिमांशु बक्षी यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता होणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading