पुणे कोरोना निर्बंधमुक्त करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय
पुणे :तब्बल 2 वर्षे 22 दिवसांनी पुणेकर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेणार आहेत. महाराष्ट्रातील पहिला करोनाबाधित पुण्यात 9 मार्च 2020 रोजी सापडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध सुरू होते
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश काढले आहेत. खडकी आणि पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डासही हे आदेश लागू असणार आहेत.
पुण्यात पहिला करोनाबाधित आढळल्यानंतर महापालिकेने गर्दीवर नियंत्रण आणणे सुरू केले होते. त्यानंतर राज्यशासनाने करोना विषाणू बाबत स्वतंत्र अधिसूचना काढत 14 मार्च 2020 पासून निर्बंध वाढवले. तर केंद्र सरकारने 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. तेव्हापासून पुण्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कधी पूर्ण लॉकडाउन, तर कधी टप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आलेले होते.
महापालिकेने शहरातील मास्क बंदी हटवली असली, तरी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. करोना रुग्णसंख्या लक्षणीय घटली असली, तरी अद्यापही नवीन रुग्ण काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळावे तसेच सॅनिटायझरचा वापरही करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
