fbpx
Wednesday, April 24, 2024
ENTERTAINMENTLatest News

सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा

बॅालिवूडसह मराठी सिनेसृष्टीलाही सर्वोत्तम कलाकृती देणाऱ्या शोमॅन सुभाष घई यांनी आपल्या आणखी एका नव्या मराठी चित्रपटाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने घोषणा केली आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘माय डॅड्स वेडिंग’ आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकार गुलदस्त्यात असून या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे होणार आहे.

नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट असणार, हे कळतेय. यापूर्वीही लोकेश गुप्ते यांनी चित्रपटांत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. त्यामुळे ‘माय डॅड्स वेडिंग’ या चित्रपटातही काहीतरी नवीन संकल्पना असणार, हे नक्की. ‘माय डॅड्स वेडिंग’ हा बहुभाषिक चित्रपट असून यात मराठी आणि इंग्रजी भाषा प्रामुख्याने ऐकायला मिळणार आहेत. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते म्हणतात, ”आजवर मी सुभाष घई यांचे काम पाहात आलो आहे. सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान आणि अनुभव खूप दांडगा आहे आणि अशा अनुभवी व्यक्तीसोबत काम करायला मिळणे म्हणजे माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. या चित्रपटातील कलाकार अजून समोर आले नसले तरी सिनेसृष्टीतील कसलेले कलाकार यात पाहायला मिळणार आहेत.

नात्यावर भाष्य करणारा हा एक कौटुंबिक सिनेमा असून तो प्रेक्षकांना नक्कीच भावेल.” तर निर्माता सुभाष घई म्हणतात, ”मराठी चित्रपटात नेहमीच सर्वोत्कृष्ट आशय असतो. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. येत्या काळातही मी अनेक दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माय डॅड्स वेडिंग’बद्दल सांगायचे तर हा विषयच खूप वेगळा आहे. संवेदनशील नाते या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.” सुभाष घई प्रस्तुत, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, मुक्ता आर्ट लिमिटेड, म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माता आहेत तर निनाद बट्टीन, तबरेज पटेल यांनी सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. मिहीर राजडा, लोकेश विजय गुप्ते यांनी चित्रपटाचे लेखन केले असून प्रदीप खानविलकर छायाचित्रण करणार आहेत. सुभाष घई यांची निर्मिती, लोकेश गुप्ते यांचे दिग्दर्शन यामुळे हा एक जबरदस्त चित्रपट असणार आहे. चित्रपटाबाबतीतील अनेक गोष्टी पडद्याआड असल्याने त्या जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली असेल. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading