एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7 दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या पांडे हिला दुहेरी मुकुट

 

एकेरीत मुलांच्या गटात राघव सरोदे याला विजेतेपद 

 
पुणे : एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या पांडे हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात एकेरीत राघव सरोदे याने विजेतेपद पटकावले.
 
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर पुण्याच्या राघव सरोदे याने आपला शहर सहकारी आर्यन किर्तनेचा 7-6(7-4), 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या लढतीत पाहिल्या सेटमध्ये राघवने कडवी झुंज देत आर्यनचा टायब्रेकमध्ये 7-6(7-4) असा पराभव करून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये राघवने आपले वर्चस्व कायम राखत तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये आर्यनची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला. राघव हा निगडी येथील सिटी प्राईड शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून पुणे विद्यापीठ येथे प्रशिक्षक यश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षांतील पहिलेच विजेतेपद आहे. दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात आरव पटेलने आर्यन किर्तनेच्या साथीत राम मगदूम व ऋषिकेश माने या जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.
 
मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित काव्या पांडे हिने अव्वल मानांकित रित्सा कोंडकरचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. काव्या ही मिलेनियम नॅशनल स्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब येथे प्रशिक्षक नवनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षांतील पहिलेच विजेतेपद आहे. तिने याआधी हरियाणा येथील चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. याच गटात दुहेरीत अंतिम लढतीत रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांनी कीर्तियानी घाटकर व तमन्ना नायर यांचा 6-0, 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 
 
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवसह्याद्री सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ, क्रीडा समितीचे सदस्य विनायक करमरकर, नवसह्याद्री सोसायटीच्या टेनिस विभागाचे सचिव विनीत लिमये, नवसह्याद्री सोसायटीच्या खजिनदार प्रीती परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवसह्याद्री सोसायटीच्या समितीचे सदस्य विकास इंगळहळीकर, मिलिंद जोशी, स्पर्धेचे संचालक केतन धुमाळ, एमएसएलटीए सुपरवायझर रिया चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 12 वर्षांखालील मुले: राघव सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन किर्तने(महाराष्ट्र)7-6(7-4), 6-3;
 
12वर्षांखालील मुली: काव्या पांडे(महाराष्ट्र)(2) वि.वि.रित्सा कोंडकर(महाराष्ट्र)(1) 6-3, 6-1;
  
दुहेरी: अंतिम फेरी: मुली: रित्सा कोंडकर/काव्या पांडे वि.वि.कीर्तियानी घाटकर/तमन्ना नायर 6-0, 6-4;
 
मुले: आरव पटेल/आर्यन किर्तने वि.वि राम मगदूम/ऋषिकेश माने 6-3, 6-2.

Leave a Reply

%d bloggers like this: