​देशपांडे पंचांग : जाणून घ्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त

गुढीपाडव्याला साधा शुभारंभाचा मुहूर्त

पुणे : नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याचा शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतो. याबरोबरच रामनवरात्र आणि घटस्थापना या दिवसापासून सुरू होते. चैत्र महिन्यापासून नूतन संवत्सर सुरू होते म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा शुभ मानला जातो. खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदा गुढीपाडवा येत्या शनिवारी (२ एप्रिल) रोजी साजरा होणार असून शुभ वेळ आणि मुहुर्त यांविषयी देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी अधिक माहिती दिली आहे.
नवीन वर्षारंभ आणि साडेतीन मुहुर्तापैकी एक हा सण असल्याने नवीन उद्योग, व्यवसाय, शुभकार्य यांचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यंदा गुढीपाडवा शनिवारी (२ एप्रिल) रोजी असून गुढी उभारण्यासाठी सूर्योदयापासून सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांपर्यंतचा मुहूर्त शुभ असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. त्यानंतर वैधृती योग सुरू होत असल्याने त्यानंतरची वेळ अशुभ मानली जाते. त्यामुळे या काळात गुढी उभारणे, घटस्थापना करणे टाळावे अशी माहिती त्यांनी दिली. या दिवशी अभ्यंग स्नान, पंचांग पूजन, संवत्सर फल वाचन यांना विशेष महत्त्व असते. अमृतकाळ सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. नवीन उद्योग सुरुवात, घर खरेदी, सोने खरेदी यांसाठी हा काळ शुभ आहे.
हिंदू नववर्ष कालगणना ही निसर्गाशी संबंधित असल्याने निसर्ग आणि सण यांचा ताळमेळ यात साधला जातो. यंदा शुभकृत संवत्सर सुरू होणार असून या संवत्सर काळात धान्य, पाऊस, पाणी हे उत्तम राहतील याची माहिती त्यांनी दिली. गुढीपाडव्याला पछडी, उगादी आणि संवत्सरा पाडो असेही म्हणतात. हा सण कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो.

Leave a Reply

%d bloggers like this: