Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : बदलत्या काळात पोलीसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलीसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या १० चारचाकी वाहनांचे लोकार्पण पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच फियाट इंडिया कंपनीचे अध्यक्ष रवी गोगीया उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, काळानुसार तंत्रज्ञानात गतीने बदल होत आहेत ही बाब चांगली आहे. परंतु काही अपप्रवृत्ती त्याचा गैरवापरही करत आहेत. त्यासाठी पोलीस दलानेही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण पोलीस दलाला डायल ११२ साठीच्या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २०२०-२१मध्ये २ कोटी तर चालू आर्थिक वर्षात १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमाला वाहने घेण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस ठाणे व इतर इमारतींच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपये खर्च केला जात आहे. राज्यातही याच प्रकारे जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दलाला पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जात आहे. नुकताच आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करुन ५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून १० टक्के म्हणजेच ५० लाख रुपये निधी त्या भागातील शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती आदींवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले. 

वळसे- पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस हे २ लाखांवर विशाल मनुष्यबळ असलेले पोलीस दल आहे. कोरोनाच्या काळामध्ये पोलीस दलाने स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावली. सेवा बजावताना अनेक पोलीस कोरोनाला बळी पडले. त्यांच्यामागे शासन खंबीरपणे उभे राहीले. त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान, कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वा्यवर गतीने नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading