fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

साहित्य मुद्रित स्वरूपात अधिक रुजते – डॉ. नितीन करमळकर

पुणे : “अलीकडे बरेच काम ऑनलाइन पद्धतीने होत आहे. मात्र साहित्य ही अशी गोष्ट आहे जी वाचनीय तेव्हा होते, जेव्हा ती अक्षर स्वरूपात आणि छापील माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचते. साहित्य हे मुद्रित स्वरूपात वाचले की पटकन रुजते आणि त्यातूनच त्याचा प्रचार आणि प्रसार होतो. कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याने आता आपली ऑनलाईन पद्धतीतून सुटका होत आहे, याचा आनंद आहे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

‘ऐसी अक्षरे’ या नियतकालीकाच्या जगतगुरु संत तुकाराम महाराजविषयक विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी डॉ. नितीन करमळकर बोलत होते. ऐसी अक्षरे’चे संपादक पदमनाभ हिंगे, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मंचाच्या उपाध्यक्षा डॉ. मेधा कुलकर्णी, अजित आणि समीर बेलवलकर आदी मान्यवर प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले,” गेली दोन वर्षे आपण सर्व एका अरिष्टतून पार पडतोय. अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले. तुकाराम महाराजांचे चरित्र पाहिले तर परमार्थात जाण्यापूर्वी त्यांच्यावरही अशी संकटे आली होती. पण त्यातून कुठेही पळून न जाता, पलायन न करता, परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि जन्म आणि मृत्यू या दोन बिंदू मधला प्रवास तो सुखकर करण्यासाठी आपल्याला आलेल्या अनुभवांवर आधारित अभंग रचले. धर्मावर असलेली उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडीत काढत सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहचवले. त्यामुळे ते जगतगुरू झाले.”

डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या,” संत, राष्ट्र पुरुष हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यांनी नुसताच अध्यात्माचा मार्ग नाही दाखवला, तर समाजामध्ये जगत असताना कसं जगायचं, का जगायचं, हे दाखवले. त्यातूनच मग समाजप्रबोधन झाले. आपण संतांमध्ये भेद करतो. मात्र ते चुकीचे आहे. संतांचे मार्ग वेगवेगळे असतील, पण त्यांची शिकवण एकच आहे, आपणही एकच आहोत. त्यामुळे आपण कुठलाही भेदभाव करता कामा नये.”

समीर बेलवलकर म्हणाले, ” तुकाराम महाराजांवर विशेषांक करणे हा शिवधनुष्य पेलण्यासमान होते. त्यांचे कार्य एका अंकामध्ये मांडायचे ही काही छोटी जबाबदारी नव्हती. हा अंक तयार करताना आम्हाला खूप काही गवसले, तसे ते वाचकांनाही गवसेल अशी अपेक्षा आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले, तर समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading