मंदिरे ही समाजाची सेवाकेंद्र व्हावी – अरुण नेटके

पुणे: मंदिरे ही समाज एकत्रिकरणाचे स्थान असून समाजाची शक्ती केंद्र आहेत. देशाच्या निम्म्यापेक्षा जास्त अडचणी सोडविण्याचे काम मंदिरे करू शकतात. मंदिरांना धार्मिकतेबरोबर समाजकार्याची जोड देवून मंदिरे ही सेवाकेंद्र देखील झाली पाहिजेत, असे मत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मठ मंदिर संपर्क प्रमुख अरुण नेटके यांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र मठमंदिर संपर्क समितीच्यावतीने मंदिर तेथे ध्वज अभियानांतर्गत पाच हजार ध्वज पूजन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील कालिकामाता मंदिर येथे करण्यात आले. यावेळी श्री कालिका माता मंदिराचे अध्यक्ष आनंद डांगरे, वि.हिं.प. पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री अ‍ॅड.सतिश गोरडे, पश्चिम महाराष्ट्र मठमंदिर संपर्कप्रमुख मनोहर ओक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ध्वजांचे औक्षण करून पूजन करण्यासोबतच पुण्यातील विविध मंदिर प्रमुखांना मंदिरावर ध्वज लावण्याकरीता सुपूर्द करण्यात आले.

अरुण नेटके म्हणाले, मंदिरे ही सेवा केंद्र करण्यासाठी प्रथम मंदिरांचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे. त्याकरीता मंदिरांत नित्य पूजा, उपासना झाली पाहिजे. मंदिर जागृक असेल तर भक्तांची संख्या देखील वाढेल, असेही त्यांनी सांगितले. आनंद डांगरे म्हणाले, युवकांचा धार्मिक कार्यातील सहभाग वाढविण्यासाठी मंदिरात सामाजिक उपक्रम देखील राबविले पाहिजे. त्याचबरोबर मंदिरांत संस्कार केंद्र देखील सुरू केली पाहिजेत.

मनोहर ओक म्हणाले, विश्व हिंदू परिषद मठमंदिर समितीतर्फे मंदिर तेथे ध्वज या अभियानांतर्गत दरवर्षी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, नाशिक, मालेगाव, नगर, श्रीरामपूर, पिंपरी-चिंचवड, बारामती अशा पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांमधील प्रमुख मंदिरांना ध्वज देण्यात येतात. यावर्षी देखील अभियानांतर्गत ध्वजांचे पूजन करून पश्चिम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाच हजार ध्वज प्रमुख मंदिरांवर उभारले जाणार आहेत. पुण्यातील बहुतांश मंदिरांमध्ये ध्वज देऊन याची सुरुवात होत आहे, असेही ते म्हणाले. संजय मुरदाळे यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: