मविआ सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए – चंद्रकांत पाटील
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने सुरुवातीपासूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. शिवाय राज्यातील शेतकरी देखील अनेक ठिकाणी सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करत असल्यामुळे, अखेर महाविकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातच शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मागे घेण्यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची घोषणा केली. या निर्णयावरून ‘महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए!’, असा टोला महाविकास आघाडी सरकारला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील हे म्हणाले, भाजपने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले.
गोरगरीब शेतकऱ्यां सोबत भाजप सदैव खंभीरपणे उभी आहे. तसेच आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा, असा टोला माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे.
