.. हा केवळ पुरस्कार नसून मातृशक्तीचा सन्मान : भारत सासणे

पुणे : समाजात मातृशक्तीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक संकटकाळी समाजाला वाचविण्यासाठी मातृशक्तीच उभी राहते. जानकी कुंटे आणि प्रतिभा व्यास यांना देण्यात आलेला पुरस्कार हा फक्त पुरस्कार नसून त्यांच्या तपस्येचा, मातृशक्तीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वानंदी क्रिएशन पुणतर्फे ‘तपस्या पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो. यंदाचा पुरस्कार पतीच्या समाजकार्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या प्रतिभा अनिल व्यास आणि मुलांच्या आवडीनिवडी, छंदांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देत त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात उंच भरारी घेण्यास मोलाचा वाटा उचलणार्‍या जानकी जगन्नाथ कुंटे यांना सासणे यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. त्या वेळी सासणे बोलत होते.  अपर्णा केळकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
सासणे पुढे म्हणाले, गप्पांच्या माध्यमातून दोन्ही सन्मानप्राप्त महिलांचे विलक्षण जीवन आपल्यापुढे उलगडले गेले आहे. त्यांचा विलक्षण जीवनप्रवास ऐकून त्यांच्या तपस्येपुढे नतमस्तक होता येईल, हे जाणवले आहे. ज्या ज्या वेळी आपल्यासमोर संकटे येतात, त्या त्या वेळी मातृशक्तीची आराधना करावी लागते तीच पाठीशी उभी राहते असे सांगून पुराणातील तपस्येचे, मातृशक्तीचे महत्त्वही सासणे यांनी उलगडून दाखविले. स्वानंदी क्रिएशनच्या या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

सुरुवातीस अपर्णा केळकर यांनी प्रास्ताविकात तपस्या पुरस्काराविषयीची भूमिका विषद केली. कलाकार, समाजसेवकाला खंबीर आणि आश्वासकपणे साथ देणे ही तपश्चर्या असते, ही साथ म्हणजे कळण्याचा कळण्याशी संवाद असतो या भूमिकेतून स्त्रीशक्तीचा सन्मान केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सासणे यांचे स्वागत मकरंद केळकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. चैतन्य कुंटे यांचे एकल हार्मोनियम वादन झाले. त्यांना कौशिक केळकर यांनी तबला साथ केली.

Leave a Reply

%d bloggers like this: