“सतराशे एक पन्हाळा” या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित अतिशय भव्य अशा “सतराशे एक पन्हाळा” या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त भोर येथील राजवाड्यात संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते स्वप्नील गोगावले, सहनिर्माते कुणाल कांबळे, दिग्दर्शक मिथिलेश सूर्यवंशी, डी.ओ.पी. अजित रेड्डी, अभिनेते मिलिंद दास्ताने, प्रकाश गरुड, अभिनेत्री पूनम कापसे, यांच्यासह अभिनेते सुशांत शेलार व स्वप्नील अमराळे यांची विशेष उपस्थिती लाभली.

या वेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते स्वप्नील गोगावले म्हणाले “निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना त्यांच्या काळात घडलेल्या प्रसंगावर एक भव्य ऐतिहासिक चित्रपट करायचा असे स्वप्न बघितले होते. आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघून मी खूप भारावून गेलो आहे. ‘सतराशे एक पन्हाळा’ साठी आमचे सह-निर्माते कुणाल कांबळे, दिग्दर्शक मिथिलेश आणि संपूर्ण टीमने गेले काही महिने खूप कसून मेहनत घेतली आहे आणि आज त्याची प्रत्यक्ष निर्मिती होत आहे हे बघून आम्हाला आनंद होत आहे.”

अभिनेते सुशांत शेलार म्हणाले “आजपर्यंत मी बऱ्याच चित्रपटात काम केले परंतु ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. ‘सतराशे एक पन्हाळा’ च्या निमित्ताने आज ही संधी मला मिळाली याचा आनंद आहे त्यामुळे या चित्रपटात आपले योगदान देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

या प्रसंगी “आम्ही सगळयांनी गेले काही महिने घेतलेली मेहनत आज फळाला आलेली बघून मी खूप भावनिक झालो आहे” असे सह-निर्माते कुणाल कांबळे यांनी नमूद केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर यांनी केले.

 “ज्या साठी लढला हर एक मावळा” अशी टॅगलाईन असलेल्या ‘सतराशे एक पन्हाळा” या चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: