Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीतून चांगले एकत्रित करुन भारताचे शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे-  डॉ.भूषण पटवर्धन

पुणे : संशोधनाची सुरुवात पाश्चात्य गोष्टींवर होते, ते आपल्याकडील गोष्टींवर देखील व्हायला हवे. पाश्चात्य विज्ञान कमी नाही, मात्र आपल्या ज्ञानपरंपरा देखील मोठया आहेत. भारतात 14 विद्या आणि 64 कला आहेत. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीतील जे चांगले आहे, त्यावर आधारित भारताचे शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे, असे मत राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचा समारोप लेडी रमाबाई हॉलमध्ये सोमवारी झाला.

यावेळी शि.प्र.मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद फडके, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सचिव राधिका इनामदार, विज्ञान भारतीचे जयंत सहस्त्रबुद्धे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कै.प्राचार्य बी.व्ही.भिडे फाऊंडेशनतर्फे प्रा.डॉ.प्रशांत दुराफे आणि डॉ. गौरी साठे यांच्या क्रोनो बायोलॉजी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. तसेच महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिके देखील देण्यात आली.

शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, पराग ठाकूर, प्राचार्य डॉ.सविता दातार, विज्ञान भारतीच्या मानसी मालेगावकर, विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.संदीप काकडे, समन्वयक डॉ.गीतांजली फाटक, डॉ.सुचेता गायकवाड, मंदार उपासनी आणि सर्व प्राध्यापकांनी महोत्सवाचे नियोजन केले होते.

डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले, आपल्या मनावर, मेंदूवर वेळोवेळी प्रहार होत गेले आहेत. पाश्चात्यांकडून येते, तेच विज्ञान असा विशिष्ट विचारधारेचे प्रभाव आपण आजपर्यंत मानत आलो आहोत. आपल्याकडील ज्ञान कमी दर्जाचे नसून भारतीय विचारांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याकडे काणाडोळा झाला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल विकिपिडायावर देखील उल्लेख नाही.

अ‍ॅड.सदानंद फडके म्हणाले, ब्रिटिशांचे आपल्यावरील गारुड बाजूला काढून आपल्याला सद््विचार जगभरात पोहोचवायचा आहे. ब्रिटिशांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या आहेत. आपले संशोधन व शोध कितीही चांगला असला, तरी देखील पाश्चात्य चष्म्यातून असल्याशिवाय त्याला मान्यता नाही. त्यामुळे आपले विसरलेले तत्वज्ञान आपण पुन्हा एकदा विज्ञानाने प्रज्वलित करुया.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading