भारत व इस्राईल चा इतिहास उल्लेखनीय कौन्सिलेट जनरल ऑफ इस्राईलचे कौन्सिल जनरल कोब्बी शोश्यानी
पुणे : भारत व इस्राईल एकाच काळातील देश आहेत. दोन्ही देशांचा इतिहास हा उल्लेखनीय आहे व त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आजची युवा पिढी हे भारताचे भविष्य आहे व ते उज्ज्वल आहे, असे मत कौन्सिलेट जनरल ऑफ इस्राईलचे कौन्सिल जनरल कोब्बी शोश्यानी यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या प्रि.एन.जी.नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रीसर्च पुणे यांच्यावतीने एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के.जैन, नियामक मंडळ सदस्य ॲड. मिहीर प्रभुदेसाई, केशव वझे, राजेश पटवर्धन,पराग ठाकूर तसेच श्रीरंग कुलकर्णी, अनय जोगळेकर उपस्थित होते.
इस्राईल व भारत यांच्यात इनोवेशन अँड आंत्रप्रिनरशिप करिता करण्यात आलेल्या सहयोगा अंतर्गत ‘व्हेन च्युटस्पा मिटस् जुगाड’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कॅन्सरच्या उपचाराकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशी यंत्रसामुग्री काही निवडक हॉस्पिटलला इस्राइल च्या वतीने देण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग भारतीय महिलांना निश्चितच होईल. औषध निर्मिती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध करून देणे पाण्याचे महत्त्व व पाणी वाचवून ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर, प्रथिनयुक्त अन्नधान्याचे उत्पादन कसे वाढवावे याचे अद्ययावत तंत्रज्ञान निर्माण करणे इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या चर्चासत्रामध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या एकूण १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राच्या प्रास्ताविकात संस्थेचे संचालक डॉ. महेश अबाळे यांनी इस्राईल व भारत यांच्यातील इनोवेशन अँड आंत्रप्रिनरशिप कॉलाबोरेशनची उद्दिष्टे व त्याचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करणारे बनावे व शिक्षणाचा प्रवास अखंड चालू राहावा असेही सांगितले. नुपूर पोकळे, श्रेयस कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
