बहारदार व्हायोलिन- सारंग जुगलबंदीने रंगला वसंतोत्सवाचा दुसरा दिवस
पुणे : ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं अतुलकुमार उपाध्ये आणि सुप्रसिद्ध सारंगीवादक दिलशाद खान यांच्या बहारदार व्हायोलिन व सारंगी जुगलबंदीने वसंतोत्सवाचा आजचा दुसरा दिवस रंगला.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने आणि गोखले कन्सट्रक्शन्सच्या सहकार्याने स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे १५ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पं वसंतराव देशपांडे यांना लहानपणापासूनच ऐकत आलो, त्यांच्याकडून शिकत आलो. आजवर संगीतात जे काही चांगलं करू शकलो, ही त्यांची शिकवण आणि आशीर्वाद आहेत, अशा आठवणी व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांनी जागवल्या.
आज पंडीतजींना आवडणारे राग आणि त्यांच्या कडून जे शिकलो ते सादर प्रयत्न करणार आहोत असे सांगत पं अतुलकुमार उपाध्ये आणि सिकर घराण्याच्या १० व्या पिढीचे सुप्रसिद्ध सारंगीवादक दिलशाद खान यांनी राग मधुवंतीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘ मैं आउं तोरे मंदिरवा’ ही रचना सादर केली. झपताल, तीन तालानंतर ‘सावरे अईजैजो सावरे…’ या रचनेने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. मुकेश जाधव यांनी त्यांना समर्थ तबला साथ केली.
यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायन सादरीकरण केले.
कोविडच्या काळात बाजारात गर्दी चालले, मात्र सभागृहात चालत नाही हे पाहून आम्हा कलाकारांचे काळीज तुटते असे सांगत या दरम्यान महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या राहुल देशपांडे आणि उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचे आभार आरती अंकलीकर टिकेकर यांनी मानले. प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकण्यासाठी आम्ही तरसलो होती, असे सांगताना आरती अंकलीकर भावूक झाल्या.
राग मारूबिहाग हा पं वसंतराव देशपांडे यांचा आवडता राग होता असे सांगत त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर ‘अब मैं युहीं जानू पेहचानू’ ही रचना त्यांनी सादर केली. यानंतर आडा चौताल मधील तराणा त्यांनी प्रस्तुत केला. ‘जागू मैं सारी बेर बलमा’ ही डॉ. प्रभा अत्रे यांनी बांधलेली बंदिश त्यांनी सादर केली. यानंतर बसंत बहारमध्ये त्यांनी ‘आई बसंत की बहार…’ ही गुरू दिनकर कैकिनी यांची रचना सादर केली. त्यांनी सादर केलेल्या ‘ बाबुल मोरा नहर छुटो जाए’ या भैरवीने आजच्या वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. त्यांना भरत कामत (तबला), तन्मय देवचके (संवादिनी), श्रेया जोशी व स्वरूपा बर्वे (तानपुरा व गायन) साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
वसंतोत्सवात शनिवार दि. २२ जानेवारी या तिसऱ्या दिवशी सायं ४ वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी गायक सौरभ काडगांवकर आपले गायन सादर करतील. यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा टॉक शो होईल. समीरन वाळवेकर हे या वेळी पाटेकर यांची मुलाखत घेतील
‘राहुल देशपांडे कलेक्टीव’ या लाईट म्युझिकवर आधारित विशेष कार्यक्रमाने या दिवसाची सांगता होईल. यात राहुल देशपांडे, दीप्ती माटे, संजॉय, ओजस अधिये, मिलिंद कुलकर्णी, अनय गाडगीळ, अभिजित बढे आणि मनीष कुलकर्णी आदी कलाकारांचा समावेश असेल.
