नथूराम गोडसेची भूमिका साकारल्याने कलाकार गांधी विरोधी होत नाही

शरद पवारांकडून खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमीकेचे समर्थन

मुंबई : कलावंत म्हणून नथूराम गोडसेची भूमिका साकारल्याने संबंधीत कलाकार गांधी विरोधी आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमीकेचे समर्थन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे हे सध्या ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. यावर प्रसार माध्यमांनी शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा रामायणात रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केले आहे असेही होत नाही. ‘गांधी’ चित्रपट सगळ्या जगात गाजला. त्यामध्ये सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकारच होता. त्यामुळे कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलले गेले पाहिजे.

दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचा निषेध केला असून सदर चित्रपट प्रदर्शीत होवू देणार नाही असे म्हंटले आहे.

भाजप कधीपासून गांधीवादी झाले?

भाजपकडून याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले, भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: