विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांनी आपले आयुष्य घडवावे – डॉ.दत्ता कोहिनकर 

पुणे : विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. तुम्ही ज्या प्रकारचा विचार करता, तशा गोष्टी घडतात. तशाच प्रकारची संप्रेरके आपल्या शरीरात तयार होतात आणि त्यावरच आपले आयुष्य अवलंबून असते. ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते, ती गोष्ट आधी करा आणि ती भिती मारुन टाका. आपल्या विचारांवर आपले आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे सकारात्मक विचारांनी आपले आयुष्य घडवा, असे मत व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर महाविद्यालयात दहावी – बारावी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. दत्ता कोहिनकर यांनी संकटाला घाबरुन न जाता त्याला कसे सामोरे जायचे, मानसिक ताकद कशी वाढवायची, ध्यान आणि विपश्यनेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले.

डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल. सकारात्मक विचारसरणीचा परिणाम आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. तणावामध्ये असताना माणूस सतत नकारात्मक विचार करतो. त्यामुळे नकारात्मक संप्रेरकांची निर्मिती होते. त्यामुळे आपले आयुष्य कसे असावे, हे आपल्याच हातात असते.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, परीक्षा, अभ्यास घरातील वातावरण यामुळे अनेकदा विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत अडकतात आणि टोकाचे पाऊल उचलतात. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. यासाठी डॉ. सुधाकरराव जाधवर महाविद्यालयात तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: