महाराष्ट्राला जिजाऊ सारख्या सक्षम राज्यकर्त्यांची गरज आहे – संभाजी ब्रिगेड
पुणे : आपला कर्तुत्ववान महिलांचा महाराष्ट्र आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद महिलांमध्ये असते. मात्र त्यांना वेळोवेळी संधी दिली पाहिजे. जिजाऊ-सावित्री-अहिल्या यांचा क्रांतिकारी इतिहास आहे. महाराष्ट्रासह देशात महिलांवर वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पुरुषसत्ताक विचारधारा असल्याने महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते, ते टाळले पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सर्वात पुढे आहेत. देशामध्ये महाराष्ट्राची जर वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर परत एकदा राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा जागर झाला पाहिजे. जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. आज तशाच कर्तृत्वसंपन्न व समृद्ध महाराष्ट्राची या देशाला गरज आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राला जिजाऊ सारख्या सक्षम राज्य राज्यकर्त्यांची गरज असून महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून महिला विराजमान झाली पाहिजे.’ तसेच पुण्यातील प्रमुख मेट्रो स्टेशनला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे नाव दिले पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
लाल महाल येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 424 व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत साखर वाटून जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरडा काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल रोहित जाधव व सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वैशाली रमाने यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, अॕड. विकास शिंदे, उपाध्यक्ष महादेव मातेरे, सचिव संदीप कारेकर, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वैशाली रमाने, अजय माने, कैलास वडघुले, सनी देशमुख, राजेश अडसूळ, ज्योतिबा नरवडे, संजय चव्हाण, सचिन गायकवाड, किर्तीकुमार घोरपडे, कुमार पवार आदी उपस्थित होते.
