“.. अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
मुंबई : ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं
– उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
