उत्तर पश्चिम भारतात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता
पुणे : मागील आढवाड्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने कहर केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून थंडी जाणवायला सुरूवात झाली होती. मात्र आज राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होवून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. येत्या आढवाड्यात याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. त्यामुळे 4 ते 7 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आज सकाळपासून तापमानात किंचित घट झाली असून दिवसभर गारवा जाणवत आहे. येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच 3 आणि 4 जानेवारी दरम्यान ओडिशा राज्यात देखील थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात जोरदार पावसासह अनेक ठिकाणी हिमवर्षाव होतं आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातील हवामानात झपाट्याने बदल घडत आहेत. 4 ते 7 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे.
