इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, गुजरात यावर्षीच्या किरिट (KIRIT) २.० चे विजेते
पुणे : पुण्यातील किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज अर्थात केआयएएमएस (KIAMS)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किरिट (KIRIT) २.० या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, गुजरातच्या टीम विजार्डने प्रथम क्रमांक पटकाविला. तर आयआयएम, जम्मूच्या टीम दिशाने दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.केआयएएमएसच्या वतीने किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. (केओईएल), किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. (केपीसीएल), किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लि. (केएफआयएल), एआरकेए फिनकॅप यांच्या विशेष सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्ण वेळ बी. टेक, बी. ई व दोन वर्षे पूर्णवेळ कालावधीचा पीजीडीएम व एमबीए करणा-या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या केस स्टडी अॅनलिसिस स्पर्धेत ७६७ संघासह २,३०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
आयआरएमए – आनंद, गुजरात, आयआयएम – काशीपूर, उत्तराखंड, आयआयएम- जम्मू, आयआयएम – अहमदाबाद, केजे सोमय्या, मुंबई, जेबीआयएमएस – मुंबई, एनआयटीआयई – मुंबई, आयईटी – लखनऊ यांच्या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. ज्यामध्ये गुजरातमधील इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंटच्या दिब्यज्योती मोहंती, विक्रम कुमार, राजीव रंजन यांच्या टीम विजार्डने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. रोख रुपये १ लाख असे याचे स्वरूप होते.
तर आयआयएम, जम्मूच्या टीम दिशाने दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. रोख रुपये ७५ हजार असे याचे स्वरूप होते. या संघात मृणालिनी मीनल, नवप्रित हंस, ध्रुव राज सिंग यांचा समावेश होता.
स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज येथे पार पडली. या वेळी अंतिम फेरीतील स्पर्धकांनी व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या किर्लोस्कर समूहातील अनुभवी प्रमुखांसमोर केस स्टडीजच्या विश्लेषणासोबतच त्यावरील उपाययोजना मांडल्या. अंतिम फेरीतील या सादरीकरणाद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या गव्हर्निंग काउंसिलचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक महेश छाब्रिया, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव निमकर, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक के श्रीनिवासन, एआरकेए फिनकॅपच्या व्यवस्थापकीय संचालिका गौरी किर्लोस्कर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
