Tuesday, June 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीची एसआयटीद्वारे चौकशी होणार

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वंकष धोरण तयार करणार

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना समाजमाध्यमाद्वारे आलेल्या धमकीच्या घटनेवर कारवाई करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात विधिमंडळ सदस्य अथवा सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन अशा घटनांना आळा बसण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनिल प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सॲपद्वारे धमकी आल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. विधानसभा सदस्यांना अनेकदा अशा धमक्या देण्यात येतात यावर कडक कारवाई होऊन भविष्यात अशा घटना घडू नये याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातील बंगलोर येथील जयसिंग राजपूत या आरोपीने धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य महत्त्वाचे असून, या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत  सहभाग घेतला. तसेच सनातन वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading