लोककला हे समाज प्रबोधनाचे विद्यापीठ – डॉ .रामचंद्र देखणे
पुणे: समृद्ध लोककलांचा वारसा महाराष्ट्र भूमीला लाभला आहे. या लोककलांचे शरीर मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. म्हणून लोककलांकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनं न पाहता समाज प्रबोधनाचे विद्यापीठ म्हणून पाहिले पाहिजे. लोककलांचा अभ्यास हा विद्यापीठस्तरावर आला पाहिजे. तर लोककलेला प्रतिष्ठेचे स्वरूप येईल आणि या पारंपरिक कलेचा प्रसार होईल, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ .रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
डॉ .रामचंद्र देखणे म्हणाले, मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहायचे असेल तर लोककलेकडे वळले पाहिजे. अध्यात्मिक विषयापासून ते सामाजिक विषयापर्यंत कोणताही विषय हा लोककलेतून सादर करता येतो. लोककला लोप पावत आहेत पण त्याचबरोबर आजची पिढी ही देखील लोककलेपासून वंचित झालेली दिसते. त्यामुळे लोककलांचा प्रचार व्हायला हवा.
प्रा. डॉ. नितीन करमाळकर म्हणाले, महान पुरुषांचे कर्तृत्व आणि सामाजिक विषय हे लोककलेच्या माध्यमातून अत्यंत निर्भिडपणे लोककलावंत सादर करत आले आहेत. लोककला ही केवळ मनोरंजनाकरीता नसून विद्यार्थ्यांना शिक्षणातही याचा खूप उपयोग होतो. परंतु अशा कला लोप पावत आहेत. या कलांना पुनर्जीवन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना लोककला समजण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते, असे ही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, कलेशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये एक तरी कला असणे गरजेचे आहे. आपल्यात कोणता कलागुण आहे हे ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ऍड शार्दुल जाधवर म्हणाले, स्पर्धेचे यंदा ४ थे वर्ष असून स्पर्धेत ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यापूर्वी प्रत्यक्षरीत्या स्पर्धेत सहभागी न होता येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन सुविधांमुळे सहभाग घेता आला. आजच्या युवकांमध्ये उत्तम विचारांची जडणघडण होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. आजचे युवक उद्याचे उत्तम नागरिक घडले पाहिजेत हा उद्देश समोर ठेवून संस्थेत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, असेही त्यांनी सांगितले.
