Thursday, September 17, 2026
BusinessPUNE

इंडस्ट्री ५.० मध्ये पर्यावरणीय बदल, जैव अर्थव्यवस्था यांचा अंतर्भाव करीत शाश्वत उद्दिष्ट्ये साध्य करण्यावर भर हवा – डॉ. प्रमोद चौधरी

पुणे  : तंत्रज्ञान, उद्योगाच्या प्रगतीविषयी सर्वच जण अभिमानाने बोलतात परंतु या प्रगतीचा एक भयावह चेहरा असलेल्या वातावरण बदलांवर बोलणे आपण टाळतो. मात्र येऊ घातलेल्या इंडस्ट्री ५.० मध्ये पर्यावरणीय बदल, जैव अर्थव्यवस्था यांचा अंतर्भाव व्हावा. इतकेच नव्हे तर पर्यावरण बदलांवर बोलणे, जनजागृती करणे, शैक्षणिक विषयात यासंबंधित परिणाम व पर्याय यांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राजचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स अर्थात आयईईई, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग व एमआयटी- एडीटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आयईईई आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पुण्यातील एमआयटी- एडीटीच्या लोणी काळभोर येथील आर. के. मेमोरियल सभागृहात सदर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘इंजिनीअरिंग, डिझाईन व होलिस्टिक एज्युकेशन मधील नवसंकल्पना’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना असून विद्यापीठाच्या आयसीटी संचालक व व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ.सुनीता कराड, आयईईईचे जागतिक अध्यक्ष डॉ.के.जे.रे लिऊ, पुणे विभागाचे अध्यक्ष गिरीश खिलारी, एमआयटी- एसओईचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य डॉ. राजेश इंगळे, डॉ. रीना पगारे, डॉ. रेखा सुगंधी, टीसीएसचे दिना खोलकर, प्राजचे डॉ. रवींद्र उटगीकर, न्यूफ्लेक्स टॅलेंटचे डॉ. भूषण केळकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘अॅबस्ट्रॅक्ट बुक’ या पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.

इलेक्ट्रिक वाहने ही विजेवर चार्ज होत असल्याने त्यांच्याकडे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहता येणार नाही असे सांगत डॉ. चौधरी म्हणाले, “जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून आपण सौरऊर्जा व पवनउर्जेवर भर द्यायला हवा. आपली शाश्वत उद्दिष्ट्ये साध्य करत असताना मानवाने रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करत उर्जेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याबरोबरच उर्जा समस्या निवारणावर लक्ष द्यायला हवे.”

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि बायोटेक्नॉलॉजी यांच्या मदतीने जैव-अर्थव्यवस्था वाढविण्यासंदर्भात आपण काम करू शकतो. बायो मोबिलिटीमध्ये काम करीत असताना हवाई इंधनासाठी शाश्वत इंधनांचा वापर वाढवायला हवा. यासाठी प्राज प्रयत्नशील असून यावर संशोधन सुरू असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

विविध शैक्षणिक कौशल्यांसोबतच समग्र शिक्षण हा आज शिक्षणातील एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र खूप कमी विद्यापिठांमध्ये यावर आधारित शिक्षणपद्धती आपल्याला पहायला मिळते. एमआयटी हे याच मोजक्या विद्यापीठांमधील आहे. मानव आणि मानवता ही संपूर्ण शिक्षणाच्या मध्यभागी असायला हवी, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.

आयईईई ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्ससाठी काम करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. भारतातील अभियंते व या क्षेत्राशी संबंधितांना जागतिक स्तरावर सुरू असलेले संशोधन, विकास याची माहिती व्हावी, याबरोबरच जगालाही भारतातील अभियंत्यांच्या कामाची माहिती व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयईईई पुणे विभागाचे अध्यक्ष गिरीश खिलारी यांनी सांगितले.

आपली अर्थव्यवस्था ही शेती व शेतीशी संबंधित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. केवळ हानी करणे हा नवसंकल्पनांचा उद्देश नसून शाश्वत विकासासाठी आज सर्वांनी एकत्र येत काम करायला हवे असे, डॉ. सुनीता कराड यांनी सांगितले.

डॉ. रीना पगारे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेखा सुगंधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading