शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी डीबीटी
पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तू स्वरुपात मिळणार्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक (डीबीटी) खात्यावर जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते. या साहित्याचे किमान दरपत्रक ठरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणार्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
रासने म्हणाले, सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या स्थितीतशाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हते. या शैक्षणिक वर्षात अजूनही शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. परंतु नजिकच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास आवश्यकतेनुसार शालेय साहित्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी पद्धतीने निधी जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे शालेय साहित्याच्या किमान दरांना आज स्थायी समितीने मान्यता दिली.
