अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीची मान्यता
पुणे : अग्निशमन दलाकडून उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणार्या ५०० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणार्या आणि ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्या इमारतींना अनुक्रमे २५ रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि ५० रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे.
रासने पुढे म्हणाले, १५ ते ४० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर १०० रुपये (किमान एक लाख रुपये), ४० ते ७० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर २५० रुपये (किमान अडीच लाख रुपये), ७० ते १०० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर ४०० रुपये (किमान चार लाख रुपये), १०० ते १५० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ५०० रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि १५० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ६०० रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
