प्लास्टिक ऐवजी सुती पिशव्यांचा वापर आप रिक्षा संघटनेचा नवीन उपक्रम
सभासदांना अल्प दरात धान्य व भुसार पुरवठा
पुणे : आम आदमी रिक्षा चालक संघटना २०१६ साली स्थापने नंतर पुण्यातील रिक्षा बांधवाच्या मदती साठी अनेक उपक्रम राबवते. कमी दरात रिक्षा इंशुरन्स, अल्प दरात परिवहन विभागाची कामे, इत्यादी. ह्या उपक्रमाद्वारे रिक्षा संदर्भात वार्षिक खर्चात आज पर्यंत ४०% पेक्षा अधिक सुट मिळवून दिली आहे. ह्या प्रयत्नांनी दर वर्षी रिक्षा चालकाचे सुमारे रु.७००० वाचत आहेत. नुकतीच मंजुर मिटर वाढी नंतर अल्प दरात मिटर रिकॉलीब्रेशन पण करत आहे. आज (दि.12) एक नवीन उपक्रम हाती घेऊन, रिक्षा चालकाचा कुटुंब खर्चात, बचत करण्यासाठी नाना पेठेत एक स्वस्त धान्य दुकानाचे उदघाटन केले आहे.
तारा मैत्रेयन ह्यांच्या हस्ते व आम आदमी पार्टीचे राज्य संघटन मंत्री विजय कुंभार यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. आप पक्षाचे श्रीकांत आचार्य, अभिजीत मोरे, मुकुंद किर्दत, किशोर मुजुमदार, जितेंद्र भावे, आप रिक्षा संघटनेचे असगर बेग, आनंद अंकुश, केदार ढमाले, अशोक शिंदे,आसिफ मोमीन व इतरांच्या साक्षीने हे उदघाटन पार पडले.
ह्या उपक्रमाचे विषेश वैशिष्ट्य म्हणजे, सर्व धान्य हे प्लास्टिक पिशव्या ऐवजी २,५ व १० किलो क्षमतेचा सुती पिशव्या मधून केले जाणार आहे. सुती पिशव्या देखील अल्प दरात, संघटना पुरवणार आहे. पंधरा वेळा सुती पिशवी वापरण्यात आली तर तिचा खर्च रु.१ पेक्षा कमी येतो. ही सवय लावून घेण्यास आप रिक्षा संघटना सभासद उत्सुक आहेत. चार हजार सभासदा पैकी दोन हजार सभासदांनी ह्या दुकानातून सुती पिशव्या मधून धान्य नेले तर वर्षाला सुमारे ८५० किलो पेक्षा अधिक, प्लास्टिक पिशव्यांचे प्रदुषण टळणार आहे. सुती पिशव्या वापर ही आप रिक्षा संघटनेच्या सभासदांची एक सामाजिक बांधिलकी आहे, ह्या साठी ते स्वताला शिस्त लावून घेणार आहेत. पुण्यातील इतर नागरिकांनी सुती पिशव्या चा वापर करण्याची शिस्त लावली तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचे प्रदुषण टळेल, हे आप रिक्षा संघटना आव्हान करत आहे.
