शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड असायला हवी – डॉ. न.म.जोशी
पुणे: आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मुलांच्या पारंपारिक शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देणे गरजेचे आहे. तरच मुले अधिक वेगाने प्रगती करू शकतात, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.
आशा प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे कोविड काळात पालकांचे छत्र हरपलेल्या समाजातील ३५ गरजू मुला-मुलींना डॉ.न.म. जोशी यांच्या हस्ते आशा शिष्यवृत्ती सन्मान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अनुराधा सहस्त्रबुद्धे, मिटकॉनचे मुख्य व्यवस्थापक गणेश खामकर, दिग्दर्शक योगेश जाधव, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली लोणकर, गणेश ठाकर, प्रतीक डांगी, सुनील मोरे, चंद्रकांत साने, मुकेश बलवार, पुरुषोत्तम डांगी आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.न. म. जोशी म्हणाले, आज जगामध्ये सर्वत्र निराशेचा अंधार पसरत आहे. अशावेळी आपल्या कामातून आशेचा दीप सर्वत्र तेवत ठेवण्याचे काम आशा प्रतिष्ठान सारख्या संस्था करत आहे. धडपड करणा-यांना यश मिळतेच, हे अनेक महान व्यक्तींनी दाखवून दिले आहे. अशा महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून मुलांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे.
डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, आजही अर्धवट शाळा सोडणा-या मुलांचे प्रमाण मोठे आहे. अशा मुलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून या मुलांना पुन्हा समाजामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे.
गणेश खामकर म्हणाले, परिस्थितीने आपल्यावर मात करण्याऐवजी आपण परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे, हे संस्कार जर आपण लहान मुलांना शिकवले तर ते निश्चितच यशस्वी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. योगेश जाधव म्हणाले, केवळ उपजिविकेसाठी शिक्षण घेणे योग्य नाही, आपण इतरांसाठी काय करू शकतो, इतरांचे दु:ख कसे कमी करू शकतो हा विचार मनामध्ये निर्माण करणा-या शिक्षणाची आज गरज आहे.
ग्रामीण दुर्गम ,शहरी झोपडपट्टी भागातील हुशार पण आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तसेच कोरोना मध्ये पालक गमावलेल्या ३५ मुला-मुलींना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची शिष्यवृत्ती व ५०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. चंदन डाबी यांनी सूत्रसंचालन केले. सोपान यादव यांनी आभार मानले.
