Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

दत्तमहाराजांच्या चरणी घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तनामाचा वेदघोष

पुणे : श्रीपाद श्री वल्लभ…अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… नर्मदे हर हर… च्या स्वरात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी प.पू.श्री.गुरू षठब्रम्ह १०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य स्वामीजी, वाई हे उपस्थित होते. तर, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोरचे प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचे आॅनलाईन प्रवचन झाले. श्रीमद्् जगद््गुरु श्री श्री श्री १००८ डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पीठ यांच्या हस्ते दत्त महाराजांची आरती झाली.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे.

शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, पाप-पुण्य व सुख-दु:ख हे प्रत्येक माणसाला संमिश्रपणे मिळते. जीवनातील दु:ख निवारणासाठी धर्मदाय आणि घोरात्कष्टात स्तोत्रपठण हा उत्तम मार्ग आहे. जीवनातील अज्ञान व समस्यांचे निराकरण करण्याकरीता हे स्तोत्रपठण केले जाते. स्तोत्रपठणाने जी स्पंदने निर्माण होतात, त्याद्वारे आपल्या ला दत्तमहाराजांचे दर्शन होते. केवळ गंध, माळा यामध्ये अध्यात्म नाही, तर निरपेक्षपणे सेवा करुन चांगले आचरण करणे हे खरे अध्यात्म असल्याचे त्यांनी सांगितले.

प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, आमच्या अघोर अशा कष्टातून सुटका कर, धर्माच्या विषयी प्रिती निर्माण करण्यासोबत सत्संग घडू देत, अशी प्रार्थना या स्तोत्रपठणातून दत्तमहाराजांच्या चरणी केली जाते. स्तोत्रपठणाचा सामुदायिक पाठ हा पुण्यात केला जातो. हे लोकमंगल स्तोत्र असून याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. त्यामुळे या स्तोत्राच्या माध्यमातून आपण प्रार्थना करायला हवी.

सुनिल रुकारी म्हणाले, दत्तजयंती उत्सवांतर्गत मंदिरासमोरील मंडपात दररोज दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक अनुरूप व्यवहाराच्या शासकीय नियमावली नुसार मुखपट्टी अनिवार्य असेल, दर कार्यक्रमानंतर उत्सव मंडपाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तापमान मापन, इ. कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. दत्तजयंती सोहळ्यात पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे अहना लिमये या ११ वर्षाच्या मुलीने घोरात्कष्टात स्तोत्रपठणात सहभाग घेत व्यासपीठावरुन उत्तमपणे पठण केले. त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, सुभाष कुलकर्णी, तेजसदादा तराणेकर, श्रीरंग लोंढे यांनी आयोजनात सहकार्य केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading