अशोक गोडसे यांच्या निधनाने गणपती मंडळांचा दीपस्तंभ कोसळला
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे : गणेशोत्सवातील एक निष्ठावान कार्यकर्ता… मानवसेवेचे महामंदिर उभे करण्याकरीता स्वत:चे घर व आरोग्यावर तुळशीपत्र ठेवणारा कार्यकर्ता…लोकाभिमुख काम करणारे पितृतुल्य नेतृत्व… असे गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकराव गोडसे यांचे निधन झाल्याने गणपती मंडळाचा दीपस्तंभ कोसळला, अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेत अशोकरावांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना अश्रू देखील अनावर झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरीता नारायण पेठेतील केसरी वाडा येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रा.स्व. संघाचे कार्यवाह महेश करपे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, कर्नल सुरेश पाटील, विवेक खटावकर, शिरीष मोहिते, पोलीस अधिकारी मकरंद रानडे, दीपक मानकर, डॉ.सतिश देसाई, सुरेश पवार, संजय मोरे, डॉ.अजय चंदनवाले, पिंगोरी ग्रामस्थ बाबा शिंदे यांसह राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व मानाच्या, प्रमुख आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीष बापट म्हणाले, गणेशोत्सव मंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करीत आहे. त्याचे नेतृत्व अशोक गोडसे करीत होते. कमी बोलून काम करणे हे त्यांचे वैशिष्टय होते. देशातील व महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना दिशा देण्याचे काम दगडूशेठ गणपती ट्रस्टने केले असून यात अशोकरावांचा मोठा वाटा आहे. समाजाकडून येणारा पैसा समाजासाठी वापरण्याची दानत व बुद्धी या ट्रस्टच्या विश्वस्तांकडे असून अखंड सेवेचे व्रत अशोकरावांनी घेतले होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, अखिल भारतीय गणेशोत्सव समितीत अशोक गोडसे यांनी माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. गणेशोत्सव हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रात सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणांची परिस्थिती लक्षात घेऊन उत्सवाचा विचार व्हावा, असा अशोकरावांचा नेहमी आग्रह असे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोविड काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अशोकरावांनी दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांनी याचे अनुकरण केले. कोविडचा प्रार्दुभाव नियंत्रणात ठेवण्यात यामुळेच यश आले. याचे श्रेय अशोकरावांना जाते. मितभाषी, सुस्वभावी असे अशोकरावांचे व्यक्तिमत्व होते. सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जाणीव त्यांच्या कार्यातून नेहमी दिसत होती. अशोकरावांच्या रुपाने एक वेगळा कार्यकर्ता पुण्यात घडला असून तात्यासाहेब गोडसे यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी ख-या अर्थाने पुढे नेला.
उल्हास पवार म्हणाले, लोकाभिमुख कार्य कसे असावे, याचा वस्तुपाठ दगडूशेठ गणपती ट्रस्ट व अशोक गोडसे यांनी घालून दिला. गणेशोत्सव मंडळांनी कशा पद्धतीने कार्य करावे, हे तात्यासाहेब गोडसे यांच्यानंतर अशोकरावांनी दाखवून दिले. ससून सारख्या सरकारी रुग्णालयातील लोकसहभागातून केलेली कामे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्टय आहे.
विजय कुवळेकर म्हणाले, ट्रस्टचे काम प्रेरणा व संस्कारांनी अधिक विस्तारले आहे. येथे कधीही पक्ष आणले गेले नाहीत. गणपती हा एकच पक्ष सगळ्यांचा आहे. त्यामुळे अशोक गोडसेंविषयी प्रत्येकाकडे काही ना काही आठवणी आहेत. प्रत्येकाशी जिव्हाळ्याने वागणारे आणि मनाने मोठे असे ते गणेशोत्सव कार्यकर्ते होते.
महेश करपे म्हणाले, सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे अशोक गोडसे यांचे व्यक्तिमत्व होते. निर्मल वारीसारख्या उपक्रमांमधून वारकरी सांप्रदायाला आधार देत पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता, असेही त्यांनी सांगितले. प्रशांत जगताप म्हणाले, अशोकरावांच्या निधनाने गणेशोत्सव संस्कृतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरुण वयापासून ३० ते ४० वर्षे त्यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्याला दिली. त्या कार्यामुळे ट्रस्ट देखील मोठे झाले आहे.
डॉ.अजय चंदनवाले म्हणाले, ससूनमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन देण्याचा निर्णय अशोकरावांनी घेतल्याने सरकारवरचा भार देखील कमी झाला. लोकसभागातून ससूनमध्ये आदर्शवत काम झाले आहे, ते त्यांच्याच पुढाकाराने. कर्नल सुरेश पाटील म्हणाले, खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम ३०० गणेशमंडळांना एकत्रित करुन झाले. याची राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेण्यात आली. एवढया मोठया प्रमाणात याकरीता जो लोकसहभाग लाभला, तो अशोक गोडसे यांच्यामुळे. पुणेकरांना गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जादा पाणीसाठी उपलब्ध झाला.
पिंगोरी येथील बाबा शिंदे म्हणाले, आपत्ती निवारणासंदर्भात बातमी वाचून आम्ही दगडूशेठ गणपती ट्रस्टला फोन केला. दुष्काळ आणि पाण्याची कमतरता ही आम्ही पिंगोरी वासियांची अडचण होती. आमच्या धरणातील गाळ काढण्याचा खर्च मोठा होता. पण अशोकभाऊंमुळे येथील गाळ काढण्याचे काम झाले. आज आमच्या दुष्काळग्रस्त गावात भरपूर पाणी आहे. गावाची भरभराट अशोकभाऊ व सर्व विश्वस्त आणि ट्रस्टमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
