थॉटपॉट एंटरटेनमेंटची पेपरबोट भेटीला…
प्रत्येकालाच आपल्या कॉलेजच्या दिवसात रमायला आवडतं… आणि त्यात मित्र – मैत्रिणींची भर पावसात भेट झाली तर विचारायलाच नको… तीन मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा नक्कीच त्यांच्या मनाचे धागे पुन्हा एकदा जुळून येतात आणि मैत्रीच्या आठवणी झरझर डोळ्यासमोरून वाहू लागतात…!! याच आठवणींची गोष्ट घेवून येत आहे, एक नवं कोरं गीत, पेपरबोट..!!
थॉटपॉट एंटरटेनमेंटच्या वतीने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याचे गीतलेखन, संगीत व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी चैतन्य कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. श्रद्धा आपटे – केळकर यांनी हे गीत गायले आहे तसेच संगीत संयोजन विभास सवार यांनी केले आहे. नुपूर दैठणकर, सुप्रिया बेलसरे व श्रद्धा आपटे यांनी ह्या गीतामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. स्नॅपसिटी या रम्य ठिकाणी याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
हा म्युजिक व्हिडीओ शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी थॉटपॉट एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरून सकाळी ११ वाजता रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती दिगदर्शक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली.
